
छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाला प्रशासनाने विद्युत रोषणाई न केल्याने भाजपतर्फे निषेध
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : ज्या महापुरुषांनी समाजाला दिशा दिली,ज्यांनी आपल्या आयुष्यात दिवाळी आणली,सुख- समृद्धी आणि आनंदाचे दीप प्रज्वलित केले त्या महापुरुषांच्या स्मारकाची दिवाळी सणानिमित्त साफसफाई व विद्युत रोषणाई करताना प्रशासनाने भेदभाव केला आहे.यंदा दिवाळीला नगर परिषद प्रशासनाने शहरातील फक्त छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच स्मारकाची साफसफाई व विद्युत रोषणाई केली असून,छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची साफसफाई केली नाही व विद्युत रोषणाईदेखील केली नाही.या दोन्ही महापुरुषांचा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना व नगर परिषद प्रशासनाला चक्क विसर पडला असून,त्याबद्दल भाजपचे शहराध्यक्ष डी.आर.काले यांनी लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.
आमदार साहेब छोट्या-छोट्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच पुढे असतात.आमदारांचा प्रशासनावर अजिबात वचक नाही.त्यामुळे प्रशासन मनमानी कारभार करत आहे.नगर परिषद प्रशासनाने दिवाळी सणानिमित्त कोपरगाव शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई व विद्युत रोषणाई करताना छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची साफसफाई व रोषणाई मात्र केली नाही.प्रशासनाने या दोन महापुरुषांच्या स्मारकाला जाणूनबुजून वगळले.सतत छोट्या-छोट्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या आमदारांनी त्याचेही श्रेय घ्यायला हवे, असा टोलाही काले यांनी लगावला आहे.
दिवाळी अर्थात दीपावली हा हिंदू समाजाचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे.दिवाळीनिमित्त घरोघरी अंगणात दिवे,आकाशकंदील लावले जातात.रांगोळी काढली जाते.फुलांची आरास व विद्युत रोषणाई केली जाते. जीवनातील अंधार घालवून सर्वांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणाऱ्या दिवाळी सणाला दिवे लावण्याची व रोषणाई करण्याची परंपरा आहे. कालपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे.प्रशासनाने कालच शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई,रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करायला हवी होती; परंतु आम्ही काल आठवण करून दिल्यानंतर उशिराने प्रशासनाने शहरातील केवळ छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची साफसफाई व विद्युत रोषणाई केली.मात्र,यातून छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला वगळण्यात आले.प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची साफसफाई करून स्मारकाभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती.प्रशासनाच्या या बेपर्वाई व मनमानीबद्द्ल नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.
ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांच्याजीवनात सुख,समृद्धी आणि आनंदाचे क्षण आले,त्यांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कसा काय विसर पडला? असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष डी. आर.काले यांनी उपस्थित केला आहे. याबद्दल लोकप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष डी.आर.काले यांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची साफसफाई व विद्युत रोषणाई केली नसली तरी भाजपच्या वतीने या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची साफसफाई करून विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे काले यांनी सांगितले.