
संपादक – राजेंद्र तासकर
कोट्यावधीची वलग्ना करुन कालवे दुरुस्तीसाठी निधी मिळवला अशा बातम्या पेरणाऱ्या सत्ताधाऱ्यांची बनावट कालवे दुरुस्ती कशी सुरू आहे याचा प्रत्यय करंजी हद्दीत दीड महिन्यापासून बेवारस व बंद अवस्थेत असलेल्या जीसीबी मशीनवरून आला आहे.अधिकारी म्हणतात डिझेलसाठी पैसे नाहीत आणि कोपरगावचे आमदार कालवे दुरुस्तीची थापा मारण्यात व्यस्त आहे.कुठे तरी थातूर मातूर कामे करून जनतेच्या मनात संभ्रम करून आभासी चित्र निर्माण करायचे असा गैरप्रकार सुरू असल्याची घणाघाती टिका कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आमदार काळे यांचे नाव न घेता करत त्यांच्या या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
ते पुढे म्हणाले की, दीड महिन्यापासून जेसीबी बंद उभा आहे याचाच अर्थ काम किती प्रामाणिक सुरू आहे हे सूज्ञ माणसाला सांगण्याची गरज नाही.निव्वळ प्रसिद्धी लाटायची आणि जनतेला वेड्यात काढायचे हे नाटक फार दिवस चालणार नसून आगामी काळात जनता अशा थापा देणाऱ्यांना थोपवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा पिकांना पाण्याची गरज असते तेव्हा रोटेशन मिळत नाही.कालवा सल्लागार समितीच्या बैठका फक्त नावाला उरल्या असून धड पाण्याचे एकदाही नीट नियोजन विद्यमान आमदारांना करता आले नाही.शेतकऱ्यांची पिके जळायची वाट बघतात आणि नंतर जखेमवर मीठ चोळतात असे सत्ताधारी सध्या काम करत आहे.काहीच दिवसांपूर्वी गोदावरी कालवा फुटला आणि लाखो लिटर पाणी वाया गेले ही घटना का घडली असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे जेसीबी प्रकरण आहे.कारण कामे नीट व वेळेवर करण्यात यांना रस नाही व वास्तविक पाहता नियोजन शून्य कारभार असल्याने फक्त सोशल मीडियावर व बातम्यांमध्ये निधीच्या बाता होतात प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे जनतेला दिसते आहे.
कालवे दुरुस्तीच्या नावाखाली इतर काही दुरुस्ती करून घेतली तर जात नाहीये ना अशी शंका उपस्थित होते आहे.या सर्व प्रकारचा लवकरच शेतकरी सोबत घेऊन आम्ही वस्तुस्थिती उघड करणार असून या जेसीबीचे पूजन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान होऊ नये अशी प्रार्थना करणार आहोत.कारण प्रसिद्धीसाठी लोकप्रतिनिधी अर्धवट कारभार हाकत असून त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो असे श्री.दवंगे शेवटी म्हणाले.