
गोदावरी नदीपात्रातून डोळ्या देखत पाणी वाहुन चालले मात्र ;पाट पाण्यावर अवलंबून असणारी शेती उध्वस्त

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – गेल्या काही दिवसांपासून नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या जखमेवर जणू मीठ चोळले असल्याची भावना कोपरगाव पंचायत समितीचे माजी. सभापती तथा प्रगतशील शेतकरी सुनिल अंबादास देवकर यांनी व्यक्त करत पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.
माजी.सभापती देवकर यांनी म्हटलें आहे की,पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असुन पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये खर्च करून कापूस,मका, सोयाबीन,भुईमुग,सुर्यफूल,टोमॅटो, आदि पिकांची पेरणी केली आहे.परंतु, अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने अनेकांचे बोअरवेल व वहिरींनी तळ गाठला असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्याचबरोबर विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्याना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी पाणी साठवण तलावाने देखील तळ गाठल्याने पिण्याचा पाण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून कोपरगाव शहरातील नागरिकांना तर १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याने कोपरगाव शहरवासीय पुरते हैराण झाले आहे. शहरातील अनके मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबाना आपले काम धंदा सोडुन पाणी येण्याच्या दिवशी रोजंदारी बुडवून घरी थांबावे लागते.
त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली असतांना, पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले जायकवाडी च्या दिशेने जाणारे हे पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते यामुळे बंद पडलेल्या विहिरी व बोअरवेल देखील सुरू झाले असते आणि विशेष म्हणजे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले गेलं असते यामुळे शहरासह नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू अन्याय केला असल्याची भावना देवकर यांनी व्यक्त करत पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.