
मुख्य संपादक राजेंद्र तासकर
कोपरगाव प्रतिनिधी : -अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून उमंग युवाशक्ती प्रतिष्ठान कुंभारी यांच्यावतीने कुंभारी नगरीतील माता -पिता व विद्यार्थी आणि श्री महेश डाळिंबकर सर यांच्यामध्ये समुपदेशन घडून आणलें त्यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधतांना श्री. डाळिंबकर म्हणाले कि, आपलं लेकरू शिवबा व्हावं असं वाटत असेल तर ;आपल्याला माँसाहेब जिजाऊ व्हावं लागेल,नव्हे नव्हे तर जिजाऊ सारखं पालक व्हावं लागेल.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी उमंग युवाशक्ती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी, माता -पिता आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले कि,माँसाहेब जिजाऊंचे स्वप्न होते कि,माझ्या शिवबाने शेतकरी, कष्टकरी, दिन- दलित व गोरगरीबांवर होणाऱ्या अन्याय विरोधात आठरा पगड जातींना एकत्र घेऊन मोगल साम्राज्य नष्ट करून स्वतःचे हिंदवी स्वराज्य स्थापन करावे त्याप्रमाणे माँसाहेबांनी शिवबाच्या मनामध्ये बालपणापासूनच स्वराज्याचे बीज रुजवले आणि म्हणून तरं महाराष्ट्राच्या वाट्याला छत्रपती शिवाजी महाराज आले. कारण, महाराष्ट्रात माँसाहेब जिजाऊ सारख्या माता जन्माला आल्या. छत्रपतींच्या बालपणाला उजाळा देतांना, ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराज पावणेदोन वर्षाचे असतांना माँसाहेबांना कामानिमित्त जावे लागले त्यावेळी बाळ शिवाजींना सांभाळण्याची जबाबदारी एका दायीस देण्यास आली. त्या दायीस सुद्धा एक लहान बाळ होते. ज्यावेळी बाळ शिवाजीने रडण्याचा टाहो फोडला काही केल्या रडते राहीना म्हणून त्या दायीने स्वतःचे दुध पाजले व शांत केले हि वार्ता माँसाहेबांना कळताच तात्काळ येऊन बाळ शिवाजींच्या तंगडया धरून उलटे केले आणि नरडयात बोटं घालून दुध बाहेर पाडले आणि म्हणाल्या कि, तुला हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याइतकं सक्षम व्हायचं असेल तर,या वाघीणीचेच दुध प्यावे लागेल, शेळीचे नाही.असे अनेक प्रसंग,उदाहरण सांगून उपस्थितांचे समुपदेशन श्री डाळिंबकर सर यांनी केले. उमंग युवाशक्ती प्रतिष्ठान ने “माझं गाव,माझी जबाबदारी ” या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा विडा उचलला आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी दर रविवारी सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत गावासह परिसर स्वच्छ करणे,झाडे लावणे व त्याची जोपासणा करणे त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांचा सत्कार करणे यासह असे अनेक उपक्रम ते राबवित असतात.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमंग युवाशक्ती प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक यशवंत गायकवाड यांनी मांडले तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. सुयोग पवार यांनी मानले.