Homeकोपरगावसत्कारासाठी व श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदारांचा आयत्या पिठावर रेघोट्यांचा केविलवाणा प्रयत्न -...

सत्कारासाठी व श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदारांचा आयत्या पिठावर रेघोट्यांचा केविलवाणा प्रयत्न – दत्ता काले

कोपरगाव शहर सुजलाम सुफलाम होण्यासाठी व विकासाची कामे भव्य दिव्य होण्याचे माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे स्वप्न होते त्यामुळे ही सर्व विकासकामे त्यांच्या स्मृतींना समर्पित करून जनसेवेसाठी लोकार्पित आहेत.शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे आणि ग्रामीण भागातील शेती मुबलक पाणी मिळून फुलावी यासाठी सार्वत्रिक प्रयत्न असावे -भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील बसस्थानक (५ कोटी ९२ लक्ष), पोलीस स्टेशन (३ कोटी ३२ लक्ष),नगरपालिका( २ कोटी+ बंदीस्त नाट्यगृह २कोटी एकूण ४ कोटी),पंचायत समिती इमारत(४ कोटी ८८ लक्ष),बाजार ओटे (२ कोटी ५० लक्ष),गोकुळनगरी पूल(३७ लक्ष),शहर अंतर्गत रस्ते (अंदाजे ५ कोटी),फायर स्टेशन (७४ लक्ष ९३ हजार),वाढीव पाणीपुरवठा योजना(७ कोटी ५० लक्ष),सार्वजनिक वाचनालय(१ कोटी ३२ लक्ष),नवीन अग्निशामक (३२ लक्ष ५० हजार) आदिंसह कोट्यावधीची कामे ही भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी निधी मिळवत उभी केली आहेत त्याचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदार आशुतोष काळे हे केविलवाणी धडपड करत असून एक प्रकारे स्वतःच्या निधीतून एकही ठोस काम लोकार्पण करण्यासारखे त्यांना गेले अडीच वर्षात करता आले नाही हे अपयश आमदार काळे यांनी कोल्हे ताईंच्या कार्यकाळातील विकासकामे लोकार्पण करण्याचा घाट घालून सिद्ध केले आहे असा घणाघात भाजपा शहराध्य दत्ता काले यांनी केला आहे.

माजी मंत्री स्व.कोल्हे साहेब यांच्या दृष्टीने शेती व पिण्यासाठी असलेला पाणी प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा राहिला आहे. त्यासाठी वेळप्रसंगी वयाच्या नव्वदी नंतरही त्यांनी मा.आ. सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या समवेत मंत्रालयात जाऊन बैठका घेतल्या.कोपरगाव शहरावर आलेल्या प्रत्येक संकटात हाकेच्या अंतरावर असलेला संजीवनी उद्योग समूह हा सर्वप्रथम धावून येतो कारण शहराची सुबत्ता राखणे हा प्रथम उद्देश कोल्हे गटाचा राहिला आहे.नगरपालिकेत शहराच्या विकासाचे सर्व ठराव हे बहुमताने मंजूर करून कायमच प्रगतीचा विचार जपण्याचे काम कोल्हे गटाने केले आहे,याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाच नंबरसह तलावांसाठीच्या जागा घेऊन ठेवत दूरदृष्टी माजी मंत्री कोल्हे साहेब यांनी जपली तर पाच नंबर तलावसाठीचा ठरावाचे अनुमोदक व सूचक हे भाजपा सेना युतीचे नगरसेवक आहेत ही वस्तुस्थिती आहे.मात्र श्रेय घेण्यासाठी काही पण..या वृत्तीने सारे काही सुरू आहे.

भाजपा प्रदेश सचिव मा.आ. सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहराला अधिकचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव बंद पाईपलाईन पाणी योजना मंजूर करून आणली मात्र काही कुटील व्यक्तींनी राजकिय फायद्यासाठी न्यायायलीन आडकाठ्या आणून कोपरगाव सह शिर्डीला येणारे पाणीही थांबवत तोंडचे पाणी अडवण्याचे पाप केले.

कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दैदिप्यमान वास्तू या डौलाने उभ्या आहेत याचे संपूर्णतः प्रयत्न हे भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचे आहेत हे सुज्ञ जनता जाणून आहे,या सर्व विकासाचे स्व.कोल्हे साहेबांचे स्वप्न साकारले याचे मला समाधान असल्याचे मत त्या वारंवार व्यक्त करतात.शहरासाठी निधी मंजूर केला त्यावेळी कोल्हे साहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र पाठवत अभिनंदन केले व सौ. स्नेहलताताई कोल्हे यांना कायम शाबासकीची थाप दिली कारण मतदारसंघासाठी भरघोस निधी उपलब्ध करण्यात सौ.कोल्हे ताई यांचे प्रयत्न आहेत.

         दुर्दैवाने आज रोजी मात्र मतदारसंघात भीषण चित्र निर्माण झाले असून पाण्यावाचून पिकांची राख रांगोळी होत आहे त्यातच वीजबिले वसुली अन्यायकारक करून वीज तासंतास नसते यामुळे डोळ्यासमोर पिकांची माती होतांना शेतकरी राजाला बघावे लागत आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत कोपरगावच्या मानगुटीवर बसवणारे कोण ?हे जनतेला ठाऊक असून एकीकडे न्यायालयाने बिगर सिंचन आरक्षणामुळे दिवसेंदिवस शेतीचे पाणी कमी होत असल्याचे निष्कर्ष नोंदवले आहे तर हरीत लवाद पिण्यासाठी सोडा पण अंघोळीसाठी देखील गोदावरीचे पाणी धोकादायक झाले असल्याचा निर्वाळा केला आहे यासाठी आपल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी कसे देता येईल यावर प्रयत्न होणे आवश्यक आहे व शेतीसाठी अधिकचे पाणी कसे उपलब्ध होईल यावर कृती होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात पिण्यासाठी पाणी नाही आणि शेतीसाठी पाणी नाही अशी दुर्दैवी वेळ ओढवली जाऊ नये यासाठी पाण्याचे राजकारण न करता हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

जर शेती फुलली तर बाजारपेठ फुलणार आहे अन्यथा शेती पाण्यावाचून उध्वस्त झाल्यास त्याला श्रेयवादाचे गढूळ राजकारण जबाबदार ठरणार आहे.

कोल्हे कुटूंब हे वेळप्रसंगी संजीवनीचे प्लँट बंद ठेऊन शहराला पाणी पुरविणारे कुटूंब आहे,त्यामुळे नजर स्वच्छ नसणारे काही लोक टीका टिपण्णी करतात त्याकडे आपण लक्ष न देता काम करत राहणे हे कोल्हे गटाचे सूत्र आहे.स्वार्थी राजकारणापोटी साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त शिर्डीला येणारे पाणी अडवण्याचे पाप काही राजकीय व्यक्तींनी केले याचे दुःख आहे मात्र भविष्यातल्या पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी दूरदृष्टीने शुद्ध पाणी जनतेला देण्याची जबाबदारी सर्वच राजकीय नेत्यांची आहे हे कुणीही डोळेझाक करू नये असाही मतप्रवाह जनतेत आहे.

माझे काम मी प्रामाणिकपणे केले व करत आहे,मला काम न करू देण्यासाठी अनेक राजकीय संकटे उभी केली गेली,न्यायालयीन आडकाठ्या निर्माण केल्या गेल्या मात्र विकासात्मक कामे मी उभी करू शकले जी उद्घाटने आता होत आहेत त्यासाठी मला निधी उभारता आला याचे समाधान अतिशय मोठे आहे असे मोठे विचार ठेऊन सर्वसामान्य दिन दलित गोर गरीब कष्टकरी व्यापारी सर्वांसाठी उपयुक्त अशा विकासकामांचा डोंगर कोल्हे ताई यांनी उभा केला त्यामुळे विद्यमान आमदारांना कोल्हे ताईंच्या काळातील निधी उपलब्ध झालेल्या कामाचे उद्घाटने करून आपला कार्यकाळ साजरा करावा लागतो आहे असे मत दत्ता काले यांनी शेवटी नोंदवले.

   
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!