
योग दिनानिमीत्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
कोपरगांव :- धावपळीच्या जीवनांमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात ताण तणाव मोठया प्रमाणांत निर्माण झाला आहे, परिणामी मानवी जीवनशैलीत असंख्य फेरबदल झाले, त्यासाठी प्रत्येकांने योग साधना केली पाहिजे, तिच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली ठरू शकते असे मत योगाचार्य उत्तमभाई शहा यांनी व्यक्त केले.

गेल्या सहा दशकापासुन (६० वर्ष) कोपरगांव शहरासह महाराष्ट्र राज्याबरोबरच देश विदेशातील साईभक्त, दुर्धर आजारांने पिडीत, तरूण तरूणी, सिने अभिनेते- अभिनेत्री, समाजकारणी, राजकारणी आदि असंख्य क्षेत्रात काम करणा-यांना श्री. उत्तमभाई शहा योगसाधना शिकवत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता नागरी पतसंस्था परिवारांने जागतिक योग दिनानिमीत्त जीवन गौरव पुरस्कार देवुन गौरव केला त्याबद्दल ते आमचे प्रतिनिधींशी बोलतांना म्हणांले. त्यांनी त्यांचा जीवनगौरव पुरस्कार योग साधकांच्या चरणी अर्पित केला आहे.

श्री.उत्तमभाई शहा पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवुन दिली. भारतीय शास्त्रात योगोपचार पध्दती अत्यंत कमी खर्चात आणि गुणकारी आहे. योगतज्ञ स्वामी बाबा रामदेव यांनी तर योगप्रसाराचे अव्यहत कार्य सुरू ठेवलेले आहे. त्यांची प्रेरणा अनेकांनी घेतली आहे. शरीर श्वास आणि मन यांना जोडणारी साधना म्हणजे योग होय. हजारो वर्षापासुन ही योगसाधना चालत आलेली आहे. पतंजली ऋषींनी अष्टांग योगशास्वात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, आणि समाधी ही आठ अंगे सांगितली आहेत. तेंव्हा प्रत्येकांने बदलत्या जीवनशैलीत योगकला आत्मसात केलीच पाहिजे. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीमध्ये त्याचा सतत अंर्तभाव झाला पाहिजे. योगामुळे ताण तणाव कमी होवुन मनुष्याला कठीण परिस्थितीत कसे सामोरे जायचे याचे आकलन प्राप्त होते. जगांने २०२१-२०२२ मध्ये कोरोना सारखी महामारी अनुभवली, आजही कोरोनाचे रूग्ण आपल्या महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यात आढळत आहे. फुफुसे कमकुवत झाल्यांने अनेकांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. मात्र योगसाधनेत प्राणायामामुळे फुफूस श्वसनक्षमता सुधारून त्यास नवचेतना मिळते. कोपरगांव ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमांतुन ज्येष्ठांचे आरोग्य अबाधीत रहावे यासाठी योगसाधनेचा नियमीत उपक्रम राबवत आहोत, माझेबरोबरच माझे चिरंजीव अभिजितने देखील माझेकडुन योगसाधनेचे धडे घेतले आहे, तो देखील अनेकांना योगसाधना शिकवत आहे.
केंद्र शासनस्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाअंतर्गत स्वतंत्र कार्यभार असलेले खाते उघडले असुन त्याअंतर्गत भारत देशासह जगभरात १० वैशिष्टयपुर्ण उपक्रमांसह योगाभ्यासाचा प्रसार, शालेय जीवनांत योगाभ्यासाच्या धड्यांचा समावेश, दहा भागीदार देशांच्या अदान प्रदान मधुन योगसाधनेला बळ दिले जाणार आहे. योग ही लोकोपयोगी चळवळ आहे तिला प्रत्येकाच्या सहभागाने व्यापक बनवावी हीच याप्रसंगी इच्छा आहे असे सांगुन उत्तमभाई शहा यांनी चर्चेचा समारोप केला.