
कोपरगाव : “विद्यार्थ्यांनी काळानुरूप तंत्रज्ञान व व्यवहारज्ञान आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे. कृषिप्रधान देशातील शेतकरी पुत्रांनी केवळ पिकवणारे न राहता उत्पादनाची योग्य विक्री करणारे उद्योजक बनावे, विद्यार्थ्यांनी एक्स्पोसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून काळाच्या प्रवाहासोबत राहण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाने आयोजित केलेला हा एक्स्पो विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यास उपयुक्त ठरणार आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता नोकरी देणारे उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कल्पना, प्रकल्प आणि कौशल्यांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची जिज्ञासा, परिश्रम आणि सर्जनशीलता दिसून येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. विवेकभैया कोल्हे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव, येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘SSGM EXPO–2026’ चा शुभारंभ महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. विवेकभैया कोल्हे यांच्या हस्ते व जनरल बॉडी व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. अॅड. संदीप वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. सदर एक्स्पोसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथकाका शिंदे यांनी शुभेच्छा संदेश पाठविला. तर अध्यक्षीय स्थान चंद्ररूप डाकले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली आचार्य यांनी नवीन तंत्रज्ञानाबरोबरच व्यवसाय आणि कौशल्य महत्त्वाचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात चंद्ररूप डाकले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी सिक्स सिग्मा ही गुणवत्ता व्यवस्थापनाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. उद्योग क्षेत्रात कार्यक्षमतेत वाढ व चुका कमी करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तरुणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळावे, यावेळी त्यांनी दावोस चे मार्गक्रमण करण्यासाठी एक्स्पो हे उत्तम उदाहरण सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात एक्स्पो हे केवळ प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांच्या संशोधन ज्ञानाचे प्रभावी प्रदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. सुरेश बोळीज, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. महेंद्रकुमार काले, महाविद्यालयाचे सर्व शाखांचे उपप्राचार्य, एक्स्पो व स्कील कोर्स चे कॉर्डिनेटर प्रा. तानसेन रणदिवे, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे व श्री. रवींद्र हिंगे यांनी केले, तर आभार वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन भागवत यांनी व्यक्त केले.