
कोपरगाव :- अहिल्यानगर (मेहराबाद) खेळपट्टीवर एकाग्र झालेली नजर, हातात धातूचा जड गोळा आणि अचूक निशाणा साधण्याची धडपड… हे चित्र सध्या मेहराबाद येथील मेहेरबाबा ट्रस्टच्या मैदानावर पाहायला मिळत आहे. निमित्त आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित ’19 वर्षांखालील मुले-मुलींची पेटांक्यू शालेय राज्य क्रीडा स्पर्धा २०२६’ !

शालेय स्तरावर खेळला जाणारा हा खेळ दिसायला जितका सुंदर आणि सोपा वाटतो, तितकाच तो बुद्धी आणि कौशल्याची कसोटी पाहणारा आहे. सध्या या खेळाने बाल गोपाळांना अक्षरशः वेड लावले आहे. खेळाची वाढती क्रेझ आणि सौंदर्य पेटांक्यू (Petanque) हा खेळ मूळचा परदेशी असला, तरी सध्या महाराष्ट्राच्या शालेय क्रीडा क्षेत्रात या खेळाने स्वतःचे एक वेगळे आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे. या खेळाचे सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे: एकाग्रता आणि अचूकता लहान वयातच मुलांची मानसिक एकाग्रता आणि शारीरिक समन्वय वाढवण्यासाठी हा खेळ सर्वोत्तम मानला जातो.

कमी जागेत मोठा थरार: एका छोट्या लाकडी चेंडूजवळ (ज्याला ‘जॅक’ म्हणतात) स्वतःचा धातूचा गोळा सर्वात जवळ फेकण्याची ही स्पर्धा शेवटच्या सेकंदापर्यंत उत्कंठा वाढवणारी ठरते.
रणनीतीचा खेळ क्रिकेट किंवा फुटबॉलसारखी अफाट पळापळ नसली, तरी या खेळातली रणनीती बुद्धिबळापेक्षा कमी नसते. त्यामुळेच शालेय स्तरावर हा खेळ प्रचंड लोकप्रिय होत आहे.दिमाखदार उद्घाटन सोहळा मान्यवरांची हस्ते पार पडला.

या तीन दिवसीय (२१ ते २३ मे) राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे , अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे प्रमुख कलच्युरी आणि ट्रस्टी प्रसाद राजू यांच्या हस्ते उत्साहात झाले.
या प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी, पेटांक्यू असोसिएशनचे राज्य सचिव प्रदीप साखरे, राज्य खजिनदार मकरंद कोऱ्हाळकर आणि कल्पेश भागवत प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, मेघशाम शिंदे, पंचप्रमुख सुभाष उंबरे व प्रवीण बेलदार यांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.
यावेळी बोलताना क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी, पेटांक्यू सारखे सुंदर खेळ शालेय स्तरावर मुलाना कौशल्याला नवी दिशा देत आहेत,” असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर कलच्युरी यांनी खेळाडूंना मेहेर बाबांच्या जीवनकार्याची माहिती देत क्रीडा संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले.
पडद्यामागील शिलेदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकरंद कोऱ्हाळकर यांनी करून या खेळाच्या महाराष्ट्रातील प्रवासावर प्रकाश टाकला, तर उपस्थित क्रीडा रसिक आणि पाहुण्यांना आपल्या रसाळ वाणीने खिळवून ठेवत संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कल्पेश भागवत यांनी केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो बाल खेळाडूंच्या राहण्याची आणि स्पर्धेची व्यवस्था चोख ठेवण्यासाठी वैष्णवी फलके आणि युवराज मांडकर व व सर्व खेळाडूंनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.