
कोपरगाव:- शहरानजीक असलेल्या अंबिकानगर येथील श्री साईधाम ट्रस्टच्या वतीने श्री समर्थ सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपाछायेखाली साई भक्त धोंडीरामबाबा चव्हाण यांनी उभारलेल्या श्री साईधाम मंदिराचा २७ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. १६ जून रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक व भक्तिपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसर साईनामाच्या गजराने दुमदुमून जाणार आहे.
प.पू. श्री धोंडीरामबाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री साईधाम ट्रस्टतर्फे आयोजित या सोहळ्याची सुरुवात १६ जून रोजी पहाटे ५ वाजता श्रींच्या मूर्तीला अभिषेक व काकड आरतीने होईल. सकाळी ७.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत भक्तिगीते व प्रवचनांचा कार्यक्रम रंगणार असून साईभक्तांना आध्यात्मिक चिंतनाचा लाभ मिळणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत पालखी सोहळा पार पडणार असून दुपारी १२ वाजता मध्यान आरती होईल. त्यानंतर दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६.३० वाजता धूपारती तर रात्री ९.३० वाजता शेजारतीने दिवसभराच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे. साईभक्तांसाठी हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा संगम ठरणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व साईभक्तांनी उपस्थित राहून श्री साईनाथ महाराजांच्या कृपेचा लाभ घ्यावा तसेच महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री साईधाम ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
हा सोहळा अंबिकानगर, येवला रोड येथील श्री साईधाम मंदिर परिसरात होणार असून कोपरगाव व परिसरातील भाविकांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या साईधाम मंदिरास आजवर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य व मठाधिपती रमेशगिरीजी महाराज, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिध्द ड्रमवादक पदमश्री पुरस्कार प्राप्तकर्ते शीवमणी, साईभक्त सुमीत पोंडा, गझलगायक राजेश कुमार, दिल्लीचे नागर बंधु, चंदीगढच्या सोनाक्षी महंत सिमरन महंत, नविदिल्लीचे लाईव्ह पेटींग आर्टिस्ट साईरतन राजेश, माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, पुणे तळेगाव दाभाडे येथील प्रतिशिर्डी चे माजी आमदार देवळे, इटली, इंग्लंड, अमेरिका, लंडन, जपान, जर्मनी येथील विदेशी व भारतभरातील साईभक्त आवर्जून भेट देतात. देश विदेशातील कलाकार येथे सदर दिवशी गायन भजन संध्या कला सादर करतात.