
कोपरगाव :- एकीकडे पवित्र अशा गौमातेला (गायीस) राज्य शासन सर्वोच्च दर्जा देऊन “राज्यमाता ” म्हणून घोषीत करते आणि दुसरीकडे त्याच राज्यमातेच्या छायाचित्राचा कॅन्सरसारखा होणाऱ्या गंभीर आजाराच्या तंबाखूजन्य पाकीटावर वापर करून समस्त हिंदु वारकरी सांप्रदायाच्या भावनांशी खेळतं असाल तर, हे खपवून घेतले जाणार नाही असा कडक शब्दांत इशारा आंदोलकांनी प्रशासनास आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दिला आहे.

समस्त हिंदू वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले ‘पंढरपूर’ येथे “ओम पंढपूरी” नावाचा वापर करून हिंदूंच्या भावना चिरडणाऱ्या ‘गायछाप’ व ‘ओम पंढरपुरी’ तंबाखू कंपन्यांविरोधात आज १६ जुलैपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र बेमुदत धरणे आंदोलन ‘माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ या संघटनेच्या वतीने सुरु केले असून, पुकारलेल्या आंदोलनाचा आज पहिलाच दिवस असून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे,
“शासनाने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले असतानाही, तंबाखूच्या पाकिटांवर गोमातेचे चित्र आणि हिंदू चिन्हे छापून कोट्यवधी भाविकांची क्रूर चेष्टा सुरू आहे. या गंभीर विटंबनेला प्रशासनाचा वरदहस्त लाभला असून, हे आता खपवून घेतले जाणार नाही, हा “करो या मरो ” असा थेट आणि कडक प्रहार आंदोलकांनी केला आहे.
आंदोलकांनी प्रशासनाकडे; १) विटंबना करणाऱ्या तंबाखू कंपन्यांवर BNS कलम २९९, ३०२ सह ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्यानुसार तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे, २ ) बाजारातील विटंबना करणारा सर्व वादग्रस्त तंबाखू साठा जप्त करण्याचे लेखी आदेश तात्काळ जारी करावे, ३ ) “गोमाता आणि ‘ॐ’ चा अपमान करणाऱ्यांची गय करु नये किंवा केली जाणार नाही हा ‘करो या मरो’ चा लढा आहे. जर ठोस कायदेशीर कारवाई झाली नाही, तर आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे तहसील प्रशासन, स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) जबाबदार असेल,” असा गर्भित व कडक इशारा आंदोलक विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांनी दिला आहे.