
कोपरगाव :- “विद्यार्थी जीवनात नेहमी आदरार्थी व शिस्तबद्ध वर्तन ठेवले पाहिजे. जीवनातील ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी आणि व्यसनांपासून सदैव दूर राहावे. प्रशिक्षणामुळे संयम, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित होतो, तसेच विविध भरती प्रक्रियेचे स्वरूप समजून घेण्यास मदत हो .ते. जीवनात आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनशैलीत निश्चितपणे सकारात्मक बदल घडवून आणावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत आणि पुढील पद प्राप्त करण्यासाठी ध्येयवादी वृत्तीने वाटचाल करावी. शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन शंभर टक्के आत्मसात करून त्याची अंमलबजावणी केल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी केले.
श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. संदीप वर्पे होते.
यावेळी एस. के. फिटनेस ॲकॅडमी संगमनेरचे श्री सागर खालकर यांनी भरतीपूर्वक परीक्षेचे स्वरूप, फिटनेस, आहार, विहार व दैनंदिन नियोजन यावर मार्गदर्शन केले. ज्ञानदा अकॅडमी, सिन्नरचे संचालक सुदाम शेळके यांनी जीवनात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे असेल, तर करिअर आवश्यक आहे; म्हणून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत असे सांगितले. आत्मा मालिक भरतीपूर्व अकॅडमीचे संचालक श्री. साईनाथ वर्पे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातून मिळालेली प्रेरणा आणि ध्येयप्राप्तीसाठी करावा लागणारा संघर्ष यांचा जीवनपाठ विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ॲड. संदीप वर्पे म्हणाले, “महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचे स्वप्न आज साकार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. समाजात पोलिसांविषयी आदरयुक्त भीतीची भावना असते. पोलिसांचे कर्तव्य, शिस्त आणि जबाबदारी यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घ्यावा. रयत शिक्षण संस्थेतील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करता यावे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना रोजगाराची संधी मिळावी, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांना दिशा देऊन ती साकार करण्याच्या उद्देशाने ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे,” असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी,“ महाविद्यालयातील ग्रामीण व शहरी भागातील युवक – युवतींना पोलीस भरतीसाठी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास व आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे,” असे स्पष्ट केले.
सदर उद्घाटन प्रसंगी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुनील गंगुले, मा. श्री. महेंद्रशेठ काले, प्रशिक्षक साजन चव्हाण, वरिष्ठ कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, वरिष्ठ वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, डॉ. विशाल पवार, श्री. एस. आर. कदम यांसह भरती करू इच्छिणारे महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा परीचय कनिष्ठ विभागाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिता अत्रे यांनी केले आणि आभार श्री. संदीप शिंदे यांनी मानले