
कोपरगाव :-आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या नगरी पंढरपुरात भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. श्री गजानन महाराज संस्थान, शेगावच्या श्री क्षेत्र पंढरपूर शाखेने वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांनी लाखो भाविकांच्या श्रद्धेला सेवेची जोड दिली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि “गण गण गणात बोते”च्या मंगल घोषात संस्थेने निस्वार्थ सेवाभावाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत आषाढी सोहळ्याला भक्तीचा नवा आयाम दिला.

अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि बारस या पाच दिवसांच्या कालावधीत श्री गजानन महाराज मठात तीन लाखांहून अधिक वारकरी भक्तांना श्री महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शिस्तबद्ध नियोजन, सेवेकऱ्यांची अथक मेहनत आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सेवा उपक्रम विशेष ठरला.
वारीत सहभागी झालेल्या ६७ भजनी दिंड्यांपैकी नियमांची पूर्तता करणाऱ्या ५१ भजनी दिंड्यांना भजनी साहित्य तसेच श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले. संत विचारांचा प्रसार आणि वारकरी परंपरेचे संवर्धन हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे संस्थेने सांगितले.
याशिवाय, संस्थेच्या धर्मार्थ अॅलोपॅथिक फिरत्या रुग्णालयामार्फत सुमारे ३० हजार वारकरी भाविकांना मोफत आरोग्यसेवा देण्यात आली. वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेत हजारो भाविकांनी संस्थेच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये आजपर्यंत २० हजार ६९ गावांपर्यंत भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करून वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेच्या संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे. आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा संस्थेचा सेवाभाव, शिस्त आणि भक्तीभाव उजळून निघाला.