Homeकोपरगावसाईबाबा कॉर्नर चौकात सिग्नल बसवणार कोण? जबाबदारी ४८ तासात निश्चित करा ……...

साईबाबा कॉर्नर चौकात सिग्नल बसवणार कोण? जबाबदारी ४८ तासात निश्चित करा …… यांचा आक्रमक इशारा

PWD आणि NHAI ला खडा सवाल; कागदी घोडे नाचवणे बंद करून ४८ तासांत तोडगा काढण्याचा आक्रमक इशारा!

कोपरगाव :- कोपरगाव शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या साईबाबा कॉर्नर चौकातील जीवघेणी वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका थांबवण्यासाठी कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवणार कोण आणि त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? याचा थेट जाब आता प्रशासनाला विचारला आहे. याबाबतचे आक्रमक मागण्यांचे निवेदन ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेचे पदाधिकारी श्री. विनय भगत, मयुर आव्हाड, अमित आव्हाड, विजय जाधव आणि कोपरगावच्या जागरूक नागरिकांच्यावतीने मा. तहसीलदार साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) उप-अभियंता साहेब आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द करण्यात आले.

या दोन्ही विभागांच्या अंतर्गत टोलवाटोलवीमुळे निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात असून, दोन्ही प्रशासनांनी तात्काळ आपली अधिकृत जबाबदारी जाहीर करावी, अन्यथा ४८ तासांनंतर तीव्र जनआंदोलनाचा भडका उडेल, असा कडक इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI नाशिक विभाग) संघटनेला दिलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, पुणतांबे फाटा ते येसगाव (ज्यामध्ये साईबाबा कॉर्नरचा समावेश होतो) हा महामार्ग जानेवारी २०२६ मध्येच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित करण्यात आला आहे.
परंतु, हस्तांतरण झाले असले तरी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची मूळ जबाबदारी नेमकी कोणाची? यावर दोन्ही विभाग मौन बाळगून आहेत. पत्रात एका बाजूला नूतनीकरणाचे काम NHAI कडे असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या बाजूला साईबाबा कॉर्नर ते पुणतांबे फाटा दरम्यानची लांबी तुमच्या अखत्यारीत आहे” असे लिहून चेंडू पुन्हा PWD कडे ढकलण्यात आला आहे. शासकीय विभागांच्या या साठमारीत कोपरगावकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

साईबाबा कॉर्नर चौकात दररोज चारही बाजूंनी वाहनांची प्रचंड कोंडी होते. अपघातांचे प्रमाण भयानक वाढले आहे. NHAI आणि PWD या दोन्ही विभागांनी चालढकल न करता येथे कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल कोण बसवणार, याची लिखित जबाबदारी २४ तासांत निश्चित करावी आणि तात्काळ प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी!
जोपर्यंत सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बसवून कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत शाळा-कॉलेजच्या गर्दीच्या वेळी—विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी—साईबाबा कॉर्नर येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस किंवा होमगार्डची नेमणूक करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ खेळणे आता खपवून घेतले जाणार नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्त्यावर अतिशय मोठे आणि जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये रस्त्यावरील सांडपाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही व रोज दुचाकी घसरून अपघात होत आहेत. दोन्ही विभागांनी कागदी घोडे नाचवणे बंद करून हे खड्डे तात्काळ दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता सुरक्षित करावा.

सध्या शाळा आणि महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या चौकातून दररोज हजारो पादचारी, लहान मुले, वृद्ध, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात (Road Cross करतात). सकाळी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांच्या प्रचंड कोंडीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण आणि धोकादायक झाले आहे. प्रशासन येथे एखाद्या मोठ्या अपघाताची आणि निष्पाप जीवाच्या बळीची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही वारंवार निवेदने दिली, प्रशासकीय निष्क्रियतेचा निषेध म्हणून दशक्रिया विधी आंदोलन’ करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहिली आणि प्रशासनाचे श्राद्धही घातले. तरीही प्रशासन केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलून वेळ मारून नेत आहे.

जर पुढील ४८ तासांत सिग्नल बसवण्याबाबत आणि रस्ता दुरुस्तीबाबत प्रत्यक्ष जागेवर सकारात्मक आणि ठोस कारवाई सुरू झाली नाही, तर ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटना आणि कोपरगावचे जागरूक नागरिक आतापर्यंतचे सर्वात आक्रमक आंदोलन छेडतील, ज्याची संपूर्ण जबाबदारी NHAI आणि PWD प्रशासनाची असेल,” असा थेट आणि कडक इशारा विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव, विजय जाधव आणि कोपरगावच्या जागरूक नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!