
कोपरगाव : – विधवा होणे हा त्या महिलेचा दोष नाही हे निसर्गचक्र आहे. पती -पत्नीमध्ये कोण अगोदर जाणार हे विधी लिखित नाही. तरीदेखील पतीच्या मृत्यूनंतर असंख्य महिलांना सामाजिक आणि धार्मिक विधी पासून बाजूला ठेवले जाते. ती विधवा आहे तिची सावली नको. काहीतरी अपशकुन होईल अजूनही समाजातील ही भावना गेलेली नाही. या सर्व गोष्टींना छेद देत सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही मंडळांना विनंती केली व सामाजिक समतेचा संदेश देत या मंडळांनी एकल महिलांच्या हातून गणरायाची आरती घेण्याचा मान दिला. पाच मंडळांनी हा उपक्रम राबवून सामाजिक समतेचा संदेश दिला. कोपरगाव, टाकळी, मुर्शदपुर या गावांमधून महिलांना आरतीचा मान दिला. बल्लाळेश्वर गणपती मंडळ, अचानक गणपती मंडळ या सर्व मंडळांचे कौतुक व आभार मानण्यात आले.


आजकाल आरतीचा मान समाजातील प्रतिष्ठेशी जोडलेला आहे. विविध सामाजिक, राजकीय, तसेच काही सेलिब्रिटी, भरघोस देणगी देणाऱ्या व्यक्तींना आरतीचा मान दिला जातो. पण तोच मान एकल महिलांना देऊन सामाजिक प्रतिष्ठा जपली गेली. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी दिली.

या उपक्रमासाठी कार्यकारिणीच्या सदस्या वर्षा गंगुले, स्मिता पोळ, प्रिया खरोटे, लता मालकर, छाया गिरमे, सारिका लकारे, गीता रासकर यांनी परिश्रम घेतले.