Homeकोपरगावदुचाकीवर मान वाकडी करून भ्रमणध्वनीवर बोलणे ही आधुनिकतेची खूण नसून विवेकाला दिलेली...

दुचाकीवर मान वाकडी करून भ्रमणध्वनीवर बोलणे ही आधुनिकतेची खूण नसून विवेकाला दिलेली सोडचिठ्ठी आहे.

“दुचाकीवरचे ‘वाकडमाने’’

कोपरगाव :-आपल्या देशात अलीकडे दुचाकीस्वारांची एक नवीन जमात उदयाला आली आहे. तिचे नाव आहे ‘’वाकडमाने’’! या जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे दुचाकी चालवताना यांची मान कायम एका बाजूला कललेली असते. खांदा आणि कान यांच्यामध्ये भ्रमणध्वनी अडकवून हे महाभाग भरधाव वेगाने गाडी चालवत असतात. जणू काही देशाची अर्थव्यवस्था यांच्या खांद्यावरच उभी आहे! यांनी दोन मिनिटे गाडी बाजूला घेऊन संभाषण केले तर शेअर बाजार कोसळणार, आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होणार आणि देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न काही लाख कोटींनी घटणार ! त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून प्रत्येक मिनिट वाचवण्याचे महान राष्ट्रीय कर्तव्य हे वाकडमाने अत्यंत निष्ठेने पार पाडत असतात.

या वाकडमान्यांची कार्यक्षमता पाहून मोठमोठ्या उद्योगपतींनाही न्यूनगंड निर्माण व्हावा! एकाच वेळी गाडीचा वेग सांभाळायचा, वाहतुकीतून मार्ग काढायचा, समोरच्या वाहनांवर लक्ष ठेवायचे आणि भ्रमणध्वनीवर अखंड बडबडही करायची! एवढी बहुविध कौशल्ये असलेली माणसे आपल्या देशात निर्माण होत असताना आपल्याला महासत्ता होण्यापासून कोण रोखू शकते? अर्थात, या महान कार्यात कधीतरी एखादा पादचारी, सायकलस्वार किंवा दुसरा दुचाकीस्वार आडवा आला आणि अपघात झाला तर त्याला या राष्ट्रीय प्रगतीसाठी दिलेले किरकोळ बलिदान समजावे!

या प्रकारामागे एक विलक्षण मानसिकता कार्यरत असते. आपल्याला आलेला प्रत्येक दूरध्वनी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तत्काळ स्वीकारला नाही तर जगबुडी होईल, असा या मंडळींचा ठाम समज असतो. वास्तविक, त्यांच्यापैकी अनेकांचे संभाषण ऐकले तर ते ‘कुठे आहेस?’, ‘काय करतोयस?’, ‘मी येतोय!’, ‘मग काय झालं?’ अशा जागतिक महत्त्वाच्या विषयांवर चाललेले असते. विशेष म्हणजे, ‘मी गाडीवर आहे, थोड्या वेळाने बोलतो’, एवढे सांगून संभाषण संपवण्याची कल्पनाही त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेला सुचत नाही. कारण त्यासाठी गाडी थांबवावी लागेल आणि आयुष्यातील दोन अमूल्य मिनिटे वाया जातील!

यामागे वेळेच्या नियोजनापेक्षा स्वतःविषयीचा फाजील आत्मविश्वास अधिक दिसतो. सतत उपलब्ध असणे म्हणजे आपण अत्यंत कार्यक्षम आणि व्यस्त आहोत, अशी एक आधुनिक समजूत निर्माण झाली आहे. आजच्या काळात हातात भ्रमणध्वनी, कानाला यंत्र आणि चेहऱ्यावर प्रचंड व्यस्ततेचे भाव असले की माणूस आपोआप महत्त्वाचा ठरतो! मग आपण कोणाशी बोलतो आहोत, कशासाठी बोलतो आहोत आणि त्या संभाषणाची तातडी किती आहे, हे प्रश्न गौण ठरतात. आपल्याला दूरध्वनी आला म्हणजे तो उचललाच पाहिजे, या मानसिक गुलामगिरीलाच आपण आधुनिक जीवनशैली समजू लागलो आहोत.

यातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे या वाकडमान्यांना स्वतःच्या जीवाइतकीच इतरांच्या जीवाचीही किंमत नसते. मान वाकडी करून गाडी चालवताना वाहनावरील नियंत्रण कमी होऊ शकते. संभाषणात गुंतल्यामुळे रस्त्यावरील अचानक बदलणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची क्षमता घटते. समोरून येणारे वाहन, रस्ता ओलांडणारे मूल किंवा अचानक थांबलेली गाडी यांचा वेळीच अंदाज घेण्यात चूक होऊ शकते. आपण कितीही कुशल चालक असलो तरी मानवी मेंदूच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात. भ्रमणध्वनी हातात न धरता बोलल्यानेही संभाषणामुळे होणारे लक्ष विचलित होणे टळत नाही. विज्ञानाचे हे साधे वास्तव मान्य केले तर आपल्या वाकडमान्यांच्या असामान्य कर्तृत्वाचे काय होणार?

विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर याच मंडळींच्या नातेवाइकांकडून ‘नशिबातच होते’, ‘देवाची इच्छा’ किंवा ‘काळ आला होता’ अशी तात्त्विक विधाने ऐकायला मिळण्याची शक्यता असते. मात्र अपघातापूर्वी गाडी थांबवून बोलण्याचा विवेक वापरला असता तर कदाचित हा तथाकथित काळ पुढे ढकलता आला असता, याचा विचार फारसा होत नाही. स्वतःच्या निष्काळजीपणाची जबाबदारी नशिबावर ढकलण्याची आपली सामाजिक परंपरा तशीही फार प्राचीन आहे!

खरे तर हा प्रश्न एका दुचाकीस्वाराच्या बेशिस्तीपुरता मर्यादित नाही. ते आपल्या सार्वजनिक जीवनातील जबाबदारीच्या अभावाचे लक्षण आहे. स्वतःची घाई, स्वतःचे काम आणि स्वतःचे संभाषण यापुढे इतरांच्या सुरक्षिततेला दुय्यम स्थान देण्याची प्रवृत्ती त्यामागे आहे. वाहतुकीचे नियम हे पोलिसांनी दंड वसूल करण्यासाठी तयार केलेले अडथळे नसून प्रत्येकाच्या जगण्याच्या अधिकाराचे संरक्षण करणारी व्यवस्था आहे, एवढी साधी जाणीवही अनेकांच्या वर्तनात दिसत नाही.

या वाकडमान्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात घ्यावी. दोन मिनिटे वाचवण्याच्या नादात आयुष्याची उरलेली अनेक वर्षे गमावण्याचा धोका ते पत्करत असतात. त्यांना स्वतःच्या आयुष्याशी जुगार खेळण्याची हौस असेलही; पण रस्त्यावरील निरपराध माणसांच्या आयुष्यावर घाला घालण्याचा अधिकार त्यांना कोणीही दिलेला नाही. अखेर प्रश्न एवढाच आहे की, ज्या संभाषणासाठी दोन मिनिटे थांबण्याची सवड नाही, त्या संभाषणाचे मोल स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवापेक्षाही अधिक आहे काय? वाकडमान्यांना याचे उत्तर शोधण्यासाठी फार मोठे तत्त्वज्ञानी असण्याची आवश्यकता नाही. फक्त एकदा गाडी बाजूला घेऊन सरळ मान करून विचार केला तरी पुरेसे आहे!

मान वाकडी करून भ्रमणध्वनीवर बोलणे ही आधुनिकतेची खूण नसून विवेकाला दिलेली सोडचिठ्ठी आहे, हे त्यातून खूब समजून असावे. त्यांना या विवेकाचे भान राहिले नाही, तर एखाद्या दिवशी त्यांना मान सरळ करण्याची संधीही मिळणार नाही! आणि मग त्यांच्यासाठी खरीच जगबुडी झालेली असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!