
कोपरगांव :- अहिल्यानगर जिल्हयातील प्रवरा नदी तिरावर नेवासा येथे ७३६ वर्षापुर्वी पैस खांबाला टेकुन संत ज्ञानेश्वरांनी भगवतगितेवरील भाष्य मराठीतुन ज्ञानेश्वरी ग्रंथाद्वारे लिहुन काढले त्यातुन तुम्हां आम्हांला संस्कृतीचा अमुल्य ठेवा मिळाला असुन संत साहित्याचे अभ्यासक लेखक नारायण कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरी आणि काव्य यातुन प्रसाद ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मीती केली हा देखील पुढच्या कित्येक पिढयांसाठी मार्गदर्शनाचा दिपस्तंभ असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुरकर यांनी केले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथील तुळजाभवानी मातेचे सेवक व अभियंते राजेश यशवंतराव कुलकर्णी व सौ. नुतन कुलकर्णी या दोघांनी वरद प्रकाशनच्या माध्यमांतुन प्रसाद ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्मीती केली त्याच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

या ग्रंथाचे लेखक व संत साहित्याचे अभ्यासक, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी श्री. नारायण कुलकर्णी (सोलापुर) यांनी विविध अध्यात्मीक पुस्तकांचे लेखन केले असुन त्यांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहे., अत्यंत कमी कालावधीत आणि वाचकांना समजेल अशा भाषेतील हा ग्रंथ आहे.

ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुरकर पुढे म्हणाले की, सातशे वर्षापुर्वी संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाची निर्मीती केली असुन ओवीच्या छंदामध्ये अन्वय लावायचा आणि त्यातुन अर्थबोध शोधायचा हि प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून मामासाहेब दांडेकर, साखरे महाराज, कंधारकर महाराज आदिंनी ज्ञानेश्वरी अधिक सुलभरित्या लिहुन काढली. संत साहित्याचे अभ्यासक नारायण कुलकर्णी यांनी वाचकांना सोप्या भाषेत ही ज्ञानेश्वरी समजावी म्हणून प्रसाद ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मीती केली आहे. आज घराघरात युवापिढीमध्ये अध्यात्माचा ठेवा लोप पावतांना दिसत आहे. भ्रमणध्वनी-अभासी माध्यमांने आपल्या मनांवर कब्जा केला आहे त्यामुळे युवकांची वाचनाची सवय कमी कमी होत आहे. ज्येष्ठांना वाचनांची आवड आहे पण त्यांच्यासाठी मराठी ग्रंथ साहित्य उपलब्धतेचे प्रमाण कमी आहे. वाचकासह भाविकांना ज्ञानेश्वरीचे सखोल ज्ञान व्हावे यासाठी प्रसाद ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचनिंय आहे तो प्रत्येकांने जरूर वाचावा असे आवाहनही त्यांनी केले. लेखक नारायण कुलकर्णी यांनी कृतज्ञेची दोन फुले या कवितेतुन आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सौ. नुतन राजेश कुलकर्णी यांनी आभार मानले.