
कोपरगाव :- कोपरगाव नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील पक्षपाती आणि दुटप्पी कारभाराविरोधात ‘माझा गाव माझा अभिमान कोपरगाव’ संघटनेच्या वतीने सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सुरू करण्यात आलेले ‘विनामंडप व कडक उन्हातील आमरण उपोषण’ नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. संघटना प्रमुख श्री. विनय भगत आणि सहकाऱ्यांनी पुकारलेल्या या तीव्र आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अजित निकत यांनी गंभीर दखल घेतली. मुख्याधिकाऱ्यांनी अधिकृत पत्राद्वारे (जा.क्र.टिपीडी/वशी/९३/२०२६) संघटनेला लेखी कळवले आहे की:१) ३ सप्टेंबर रोजी विस्थापित केलेल्या सर्व गरीब हातगाडी व टपरी धारकांना तात्काळ पर्यायी अधिकृत जागा (हॉकिंग झोन) देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा अधिकृत प्रस्ताव नगरपरिषदेने शासनाकडे सादर केला आहे.२)शहरातील कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि मंगल कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी, नगरपरिषद स्तरावर लवकरच रस्त्याच्या बाजूला योग्य स्थान (पार्किंग झोन) निश्चित करून त्यावर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने मागण्यांची कायदेशीर अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर, संघटनेच्या वतीने हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

“हा कोपरगावमधील गोरगरिबांच्या एकजुटीचा आणि सत्याचा विजय आहे. प्रशासनाने बड्या व्यावसायिक संकुलांच्या आणि मंगल कार्यालयांच्या बेकायदेशीर गाळ्यांवर व गायब पार्किंगवर कठोर कारवाई करावी, ही आमची मागणी कायम आहे,” असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषदेने दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे विस्थापित गरिबांचे पुनर्वसन वेळेत पूर्ण न झाल्यास आणि अनधिकृत बांधकामांवर एमआरटीपी (MRTP) अंतर्गत गुन्हे दाखल न केल्यास, यापेक्षाही अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेचे विनय भगंत, विजय जाधव आणि मयूर आव्हाड यांनी दिला आहे.