Homeशिर्डीरेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडणार : खा. भाऊसाहेब वाकचौरे

रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडणार : खा. भाऊसाहेब वाकचौरे

कोपरगाव :- शिर्डी साईनगर ते नाशिक रेल्वे प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी केंद्र सरकारच्या स्तरावर मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. शिर्डी येथे रेल्वे प्रकल्पात बाधित होणाऱ्या कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी व प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पोहेगाव, चांदेकसारे,सोनेवाडी बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, बहादुरपूर तसेच राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे व डोऱ्हाळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध अडचणी व मागण्या मांडल्या.

शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करताना गॅझेटमध्ये केवळ अहिल्यानगर जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनींचे भूसंपादन एकाच वेळी करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित झालेल्या जमिनींप्रमाणे या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा, गोदावरी उजवा कालवा व निळवंडे लाभक्षेत्रातील बागायती जमिनींना बागायती जमिनीचा दर्जा देऊन त्याप्रमाणे मोबदला मिळावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा, अशा मागण्या खासदार वाकचौरे यांनी केंद्र सरकारकडे करण्याचे सांगितले.

यावेळी रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी बी. के. सिंग, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, बाळासाहेब पवार, मुकुंद सिनगर आदी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे म्हणाले की, “आमचा विकासाला विरोध नाही. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळायला हवा ही माफक अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांनी बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. रेल्वे प्रकल्पाधिकारी बी. के. सिंग यांनीही शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. ॲड. काळे यांनी रेल्वे कायद्यानुसार बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली.

दरम्यान, बैठकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील इतर विविध समस्या व प्रश्नही नागरिकांनी खासदार वाकचौरे यांच्यासमोर मांडले. संबंधित सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार वाकचौरे यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!