Homeनाशिकसिन्नरअनुभवातून शिक्षणाचा आनंद घेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

अनुभवातून शिक्षणाचा आनंद घेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

सिन्नर प्रतिनिधी :- सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालय, पंचाळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे अभ्यासपूर्ण शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित स्थळांना भेट देत प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान संपादन केले.

क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभव आणि कृतीतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट ➡️ क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. विमानतळाची रचना, विविध विभाग, विमानांची ये-जा, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा तसेच हवाई वाहतूक व त्यासाठी राबवली जाणारी सुरक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवाई वाहतूक कशी नियंत्रित केली जाते, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना माहितीच्या माध्यमातून उत्तरे मिळाली.

शिवसृष्टीतून इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव ➡️ यानंतर विद्यार्थ्यांनी शिवसृष्टीला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा, शौर्याचा, स्वराज्यनिर्मितीचा आणि तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केला. शिवरायांच्या काळात वापरात येणाऱ्या तलवारी, बाण, भाले व इतर युद्ध साहित्याची माहिती, वापर विध्यार्थ्याना मिळण्यास या क्षेत्रभेतीतून मदत झाली.विविध ऐतिहासिक प्रसंग व कलात्मक मांडणी पाहताना विद्यार्थ्यांना इतिहास विषय अधिक जिवंत आणि रंजक पद्धतीने समजून घेता आला. स्वराज्य, धैर्य, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम यांसारख्या मूल्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.

पालखी निवारा येथे पक्षी व मासे निरीक्षण ➡️ पालखी निवारा येथे विद्यार्थ्यांनी पक्षी व मासे निरीक्षणाचा आनंद घेतला. परिसरातील विविध पक्ष्यांचे व विविध मासे निरीक्षण करताना त्यांच्या सवयी, अधिवास आणि निसर्गातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. निसर्गाशी जवळीक साधत पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन ➡️ क्षेत्रभेटीचा महत्त्वाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. शिर्डीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश तसेच सर्वधर्मसमभावाची शिकवण याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.

साई भोजनालयाला भेट ➡️क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी साई भोजनालयात भोजनाचा लाभ घेतला. सामूहिक भोजनातून शिस्त, स्वच्छता, सहकार्य आणि एकमेकांप्रती आपुलकी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी अनुभवले.

अनुभवातून शिक्षणाची नवी दिशा➡️ या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणापेक्षा वेगळ्या वातावरणात प्रत्यक्ष निरीक्षण व अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. इतिहास, भूगोल, विज्ञान, पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये अशा विविध विषयांचा एकत्रित अनुभव विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून मिळाला.

विद्यार्थ्यांनी संपूर्ण क्षेत्रभेटीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध स्थळांची माहिती जाणून घेताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा आणि शिकण्याची उत्सुकता दिसून आली. “अनुभवातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कार” या उद्देशाला अशा विद्यार्थी अभ्यास क्षेत्रभेटीमुळे निश्चितच बळकटी मिळेल असे प्रतिपादन माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर शिक्षण संसथेचे सचिव राजेश गडाख सर यांनी व्यक्त केले. सिन्नर तालुक्याचे माजी आमदार स्व.सिन्नर भूषण सूर्यभानजी नानासाहेब गडाख यांच्या आशीर्वादातून व सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेल्या या विद्यालयाच्या क्षेत्रभेटीसाठी साठी व्यवस्थापक आर. एस. गडाख, प्राचार्य विलास पवार, कॉलेज विभाग प्रमुख प्रवीण शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले. इयत्ता तिसरीतील 54 विद्यार्थी व चौथी मधील 33 विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीत सहभाग नोंदवत विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात, मयुरी हिवरडे, विनायक पगार, दत्ता थोरात, , शितल नाजगड, अंजली डुंबरे, सायली जाधव, वर्षा उगले, सुनीता शिंदे, जयश्री गुरुळे आदी शिक्षकांनी विशेष मेहनत केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची, शिस्तीची आणि नियोजनाची विशेष काळजी विद्यालयातील शिक्षकांकडून घेण्यात आली. क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक व संबंधित सर्वांचे सहकार्य लाभले.

सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालय, पंचाळे विद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंदासोबतच ज्ञान, संस्कार आणि प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!