
कोपरगाव :- महाराष्ट्र शासनाने चालू वर्षी राज्यभरात व कोपरगाव तालुक्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर केला असला, तरी शासनाची मदत केवळ कागदावरच राहिली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर दमडीही जमा झालेली नाही. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत तालुक्यातील बँका, सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट बँका आणि खाजगी फायनान्स कंपन्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांकडे सक्तीची कर्ज वसुली आणि मानसिक छळ सुरू केला आहे. हा जुलमी कारभार तात्काळ न थांबल्यास कोपरगाव तालुक्यातील वित्तीय संस्थांच्या कार्यालयांना टाळे ठोकून तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘माझा गाव माझा अभिमान, कोपरगाव’ संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या संदर्भातील सविस्तर कायदेशीर मागण्यांचे निवेदन संघटनेचे पदाधिकारी श्री. विनय भगत, श्री. मयुर आव्हाड आणि श्री. विजय जाधव यांच्या स्वाक्षरीने राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाला पाठवण्यात आले आहे.
आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दुष्काळामुळे ग्रामीण भागातील खरेदी क्षमता शून्य झाली असून कोपरगाव शहरातील संपूर्ण मार्केट ठप्प झाले आहे. व्यापारी वर्ग प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला असून दुकानांचे भाडे भरणेही मुश्कील झाले आहे. अशा वेळी बँकांनी कोर्ट-कचेरीच्या कारवाया, जप्त्या आणि चेक बाऊन्सचे (Sec 138) खटले दाखल करून शेतकरी व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये. जोपर्यंत दुष्काळ कायम आहे आणि शासकीय मदत मिळत नाही, तोपर्यंत कर्ज वसुलीला अधिकृत शासन निर्णय (G.R.) काढून पूर्णविराम देण्यात यावा.
दुष्काळी सवलतींचा मुख्य भाग म्हणून बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फी माफी मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, सध्या कोपरगाव तालुक्यात १० वीचे बोर्डाचे परीक्षा फॉर्म भरताना शाळा आणि शिक्षण मंडळाकडून सक्तीने फी वसूल केली जात आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. केवळ १० वीच नव्हे, तर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांसह सर्व उच्च माध्यमिक व महाविद्यालयांमधील सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा फी आणि शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे आणि चालू वर्षात घेतलेली फी पालकांना तात्काळ बँक खात्यावर परत (Refund) करावी, अशी आक्रमक मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या निवेदनाची वेळेत दखल घेऊन सक्तीची कर्ज वसुली आणि विद्यार्थ्यांची फी वसुली तात्काळ न थांबवल्यास, समस्त शेतकरी, पालकांना व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटना रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असा इशारा विनय भगत, मयुर आव्हाड व विजय जाधव यांनी दिला आहे.