Homeकोपरगावपत्रकारांना एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच; अभिनव उपक्रम - सहाय्यक गटविकास...

पत्रकारांना एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच; अभिनव उपक्रम – सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक

कोपरगाव :- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना वृत्तांकनासाठी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता कर्तव्य बजावावे लागते. बहुतांश पत्रकारांचा प्रवास दुचाकीवरून होत असल्याने प्रवासादरम्यान अपघाताची शक्यता असते. अशा वेळी उपचारांचा मोठा खर्च तसेच कुटुंबाची होणारी धावपळ लक्षात घेता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांना देण्यात आलेले अपघाती विमा कवच हा निश्चितच अभिनव उपक्रम आहे, असे गौरवोद्गार कोपरगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे व जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोपरगाव तालुकाध्यक्ष प्रा. विजय कापसे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील ५० हून अधिक पत्रकारांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. या विमा संरक्षणासह संघटनेच्या ओळखपत्रांचे वाटप नुकतेच जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी दळवी बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रा. विजय कापसे यांनी केले. त्यांनी संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच संघटनेच्या कार्यविस्ताराची माहिती दिली. आदिनाथ ढाकणे यांनी संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष जनार्दन जगताप यांनी संघटनेची माहिती देत ओळखपत्राचे महत्त्व व फायदे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव विनोद देवरे यांनी केले, तर आभार प्रमोद पवार यांनी मानले. यावेळी शहराध्यक्ष हफिज शेख, कचरू लोहकरे, संजय लाड, रहीम पठाण, विशाल लोंढे, मिलिंद विघे, महेश गायकवाड, योगेश रुईकर, अनिल दीक्षित, सुनील ससाणे, योगेश डोखे, सोमनाथ डफळ, रवी वाघडकर, राजेंद्र तासकर, सतीश जाधव, अक्षय काळे, अमोल गायकवाड, शहाबाज कुरेशी आदी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!