Homeकोपरगावमहाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करा; आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे...

महाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करा; आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे डॉ. अशोक गावित्रे यांची निवेदनाद्वारे मागणी

कोपरगाव : महाराष्ट्र राज्यात अवयवदान, नेत्रदान, त्वचादान व देहदान चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय धोरण तयार करावे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात अवयवदान समुपदेशन कक्ष स्थापन करून प्रशिक्षित अवयवदान समुपदेशकांची नियुक्ती करावी, अशी मागणी अवयवदान समुपदेशक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भारतामध्ये अवयव प्रत्यारोपणाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतानाही जनजागृतीचा अभाव, ब्रेन स्टेम डेथविषयी गैरसमज, प्रशिक्षित समुपदेशकांची कमतरता आणि रुग्णालयांमधील समन्वयाचा अभाव यामुळे अनेक संभाव्य अवयवदानाच्या संधी प्रत्यक्षात येत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. गावित्रे यांनी निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. ▪️नव्याने समाविष्ट होणाऱ्या 108 ॲम्बुलन्स वर ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी क्यू आर कोड लावण्यात यावे तसेच त्यावरील डॉक्टर व पायलट यांना अवयवदान संदर्भातील प्रशिक्षण द्यावे,▪️महाराष्ट्रात स्वतंत्र अवयवदान समुपदेशक संवर्ग निर्माण करावा.▪️प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अवयवदान समुपदेशन कक्ष सुरू करावा.▪️शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयवदान प्रशिक्षण व जनजागृती केंद्र सुरू करावे.▪️प्रत्येक तालुक्यात अवयवदान जनजागृती समिती स्थापन करावी.▪️ब्रेन स्टेम डेथविषयी नागरिकांमध्ये शास्त्रीय जनजागृती करावी.▪️अवयवदान समुपदेशकांसाठी शासनमान्य प्रशिक्षण व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा.▪️पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि रुग्णालयांमध्ये समन्वय व्यवस्था निर्माण करावी.▪️नेत्रदान, त्वचादान आणि देहदानासाठी स्वतंत्र जनजागृती अभियान राबवावे.▪️अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण व शासकीय मान्यता द्यावी. ‘अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती माणुसकीची चळवळ आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या दानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे अवयवदानासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून सक्षम शासकीय यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे,’ असे डॉ. अशोक गावित्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून राज्यात स्वतंत्र अवयवदान, नेत्रदान, त्वचादान व देहदान जनजागृती आणि समुपदेशन धोरण तयार करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!