
कोपरगाव :- पुणे येथे जानेवारी महिन्यात होत असलेल्या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी साहित्यिकांना आमंत्रित करण्यासाठी नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यतक समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद कोपरगाव शाखेच्या वतीने एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन परिषदेचे अध्यक्ष प्रा डॉ एड हिरालाल महानुभाव यांनी केले होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे प्रा डॉ बाबुराव उपाध्ये होते प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाहक डॉ स्वाती महाळंक या होत्या व्यासपीठावर वात्रटिकाकार कवी विजय वहाडणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सौ. शैलजा रोहोम, प्रा राजेंद्र साळुंके, प्रा शिवाजीराव बारगळ, प्रा. डॉ गणेश देशमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

नांदी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित कविंच्या कविता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डी येथील नवोदित कवी प्रा गोंदकर यांनी आपल्या कवितेतून रसिकांना मंत्रमुग्ध केले तर नवोदित कवयित्री
कु अंजली चिखले हिच्या कवितेने सर्व साहित्य प्रेमींना चिंतनशील करायला लावले. अशीच एक नवोदित कवयित्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थ्यीनी कु. रेवती चव्हाण हिच्या कविता मनाला भुरळ घालून गेली कवी कैलास साळगट, कवी दत्तात्रय विरकर यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा, ग्रामीण भागातील जीवन रसिकांसमोर गाऊन व्यक्त केले कवी प्रमोद येवले यांनी मराठी भाषा जतन संवर्धन करणारी कविता सादर केली तर कृषी शेतकरी बाळासाहेब देवकर यांच्या कवितेतील शेतकरी मनाला स्पर्शून गेला सौ. वंदना चिकटे यांनी आपल्या कवितेतून मैत्रीचं नातं व्यक्त केले सौ.शैलजा रोहोम यांची
कविता भावस्पर्शी होती प्रा सौ ढमाले यांनी नव्या चालीची ( न थांबता जलद म्हटली जाणारी ) कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली वृत्तपत्र छायाचित्रकार कवी हेमचंद्र भवर यांनी आपल्या कवितेतून राजकारण आणि नोकरीच्या संघर्षाची कहाणी शब्दबदध केली. वात्रटिकाकार कवी विजय वहाडणे यांनी आपल्या सर्वांगीण चारोळ्यांनी हास्याचे फवारे उडविले जेष्ठ साहित्यिक डॉ दादासाहेब गलांडे यांच्या कवितेतील मानवी जीवन जगण्याच्या संघर्षाचे शब्दचित्र दिसून आले.
अशा सर्वच विषयांचा ऊहापोह करत सर्व कविंनी आपल्या कविता सादर करून शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी केली. मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी ग्रामीण भागातील कवी नक्कीच हातभार लावत आहेत हेच यातून स्पष्ट झाले. अशा रसिकतेने नांदी साहित्य संमेलनाचे सुप वाजले.