
१४ वर्षांखालील मुलींच्या संघाचे अजिंक्यपद; १९ वर्षांखालील मुलांचे उपविजेतेपद
कोपरगाव :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सोमैया विद्याविहार, मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. या विजयी संघात सायली माने, श्रद्धा साबळे, समृद्धी साबळे, आदिती जमधडे आणि रोहिणी कुलकर्णी यांचा समावेश होता.
तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. या संघात साईश शिंदे, वेदांत कौसे आणि तेजस जेऊघाले यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या संघात सिद्धी साबळे, रिद्धी साबळे आणि श्रुती मोकळ यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर १४ वर्षांखालील मुलींच्या संपूर्ण विजयी संघाची तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटातील रिद्धी साबळे यांची पुणे विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. संजय अमोलिक, तसेच श्रीमती रूपाली टेके आणि श्रीमती शुभांगी राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैया सर, क्रीडा अकादमीचे प्रमुख एझाझ खान सर, आदित्य सिंग सर, स्थानिक शाळा समितीचे सचिव मा. सुहास गोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय राऊत, क्रीडा समन्वयक श्री. रोहन शिंदे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.