Homeकोपरगावओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये साचलेले पाणी काढले बाहेर संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा धावली...

ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये साचलेले पाणी काढले बाहेर संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा धावली आपदग्रस्तांच्या मदतीला

संपादक – राजेंद्र तासकर

               गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटसमयी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नागरिकांच्या मदतीला धावून जात सामाजिक बांधिलकी जोपासली.आजही विवेकभैय्या कोल्हे यांनी टाकळी नाका निवारा कॉर्नर भागातील ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये पावसामुळे साचलेले पाणी बाहेर काढून जनसेवेसाठी आपण किती तत्पर आहोत याची प्रचिती आणून दिली.
           कोपरगाव शहर आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडाली. शेकडो घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.एवढे मोठे संकट कोसळले असताना नागरिकांनी कळवूनही नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या मदतीला धावून आले नाही.मात्र,युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना शहरातील ही परिस्थिती माहीत होताच त्यांनी संजीवनी उद्योग समूह आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्ती निवारण पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल होत अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मदत करून दिलासा दिला.
         सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळी रोडवरील निवारा कॉर्नर भागातील ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.या व्यापारी संकुलात असलेली साई साक्षी मोबाईल शॉपी,श्री साईनाथ लॉड्री,साई शीतल लॉड्री,गुडलक सलून, संतोष आर्टस आदी दुकाने पाण्याखाली गेली होती.या दुकानांमध्ये कंबरेइतके पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते.येथील व्यापाऱ्यांनी वारंवार सांगूनही नगरपालिका प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही.उलट विवेकभैय्या कोल्हे आणि संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा या व्यापाऱ्यांच्या मदतीला धावून आली.
  मंगळवारी सकाळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आणि माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या यंत्रनेला पाचरण करून ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये तात्काळ धाव घेऊन अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची मदत केली.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्ती निवारण पथकाने अग्निशमन बंबाच्या मदतीने या कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील दुकानांमध्ये साचलेले संपूर्ण पाणी बाहेर काढले.तीन-चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कॉम्प्लेक्समधील पाणी बाहेर काढण्यात आले.     यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर.काले,माजी नगरसेवक जनार्दन कदम आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    साई साक्षी मोबाईल शॉपीचे मालक राहुल कासार यांनी सांगितले की,सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला.त्या पावसाचे पाणी आमच्या दुकानांमध्ये शिरले होते. कंबरेएवढे पाणी साचल्याने आम्हा सर्व दुकानदारांचे व्यवहार बंद झाले.आम्ही नगर परिषदेला कळवले;पण तांत्रिक कारण सांगून त्यांनी मदत केली नाही. खासगी वाहनाच्या मदतीने पाणी काढण्याचा प्रयत्न केला;परंतु त्यात यश आले नाही.अखेर संजीवनी उद्योग समूह आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्ती निवारण पथक तातडीने आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी आमच्या दुकानाभोवती साचलेले संपूर्ण पाणी बाहेर काढून आम्हाला मदत केली.त्याबद्दल आम्ही विवेकभैय्या कोल्हे आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे आभार मानतो,असे कासार म्हणाले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!