
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : आज गुरुवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आषाढी एकादशीनिमित्त येसगाव येथील मुस्लिम समाजबांधवांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आणि भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवास स्थानी जाऊन त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
स्नेहलताताई कोल्हे यांनी आनंदाने मुस्लिम बांधवांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.आषाढी एकादशी आणि बकरी ईदचे औचित्य साधून येसगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी वारकरी व भाविकांना फराळ वाटपाचा उपक्रम राबविला, याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे कौतुक केले.सामाजिक सलोखा व सामाजिक ऐक्य राखण्यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या,हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आज एकाच दिवशी आले आहेत. हिंदू आणि मुस्लिम बांधवांसाठी आजचा दिवस उत्साहाचा आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त मुस्लिम समाजबांधव मला भेटण्यासाठी आले व त्यांनी मला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या याचा मला अतिशय आनंद झाला.मी देखील सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.आम्ही सर्वांनी एकत्र फराळ घेतला.

यावेळी येसगाव येथील गुलाबभाई तांबोळी,सरवारभाई शाह,मोबिनभाई सय्यद,आरिफभाई तांबोळी, अल्ताफभाई,हसनभाई आदी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.आज बकरी ईदची नमाज अदा केल्यानंतर या सर्व मुस्लिम बांधवांनी येसगाव येथील मंगल कार्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या दिंडीतील वारकरी व भाविकांना फराळ वाटप केला. त्यांनी राबविलेला हा उपक्रम खरोखरच अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद आहे.अशा उपक्रमातूनच जातीय व सामाजिक सलोखा राखण्यासाठी मदत होते.या मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीनिमित्त राबविलेल्या या अनोख्या उपक्रमा बद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करून मन:पूर्वक आभार मानले.या उपक्रमामुळे नवीन पिढीला एक चांगला संदेश मिळाला आहे,असे त्यांनी सांगितले.
सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन सामाजिक,राजकीय वाटचाल केली पाहिजे,असे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब नेहमी सांगत असत.त्यांनी स्वत:आयुष्यभर सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण केले.ते सर्व समाजाच्या सुख-दु:खात सहभागी होत असत.सामाजिक व जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.स्व.शंकरराव कोल्हे साहेबांचा हाच वारसा आम्ही कोल्हे कुटुंबीय आजही पुढे चालवत आहोत, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या,बकरी ईदचा सण प्रेम, निस्वार्थीपणा,मानवता आणि त्यागाची शिकवण देतो.इस्लाम धर्मात बकरी ईद सणाला खूप महत्त्व आहे.यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आजच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा बंधुत्व व सामाजिक एकोपा वाढविणारा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले.