
श्रीक्षेत्र संवत्सर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्व महिला भगिनींनी एकत्रित येत अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त ज्ञानेश्वरी सामूहिक पारायणाचे आयोजन केले होते.त्याची सांगता ह भ प संगीता महाराज चव्हाण यांच्या किर्तनाने झाली.
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
भगवंत भावाचा भुकेला आहे, नामस्मरण हे त्याचे माध्यम आहे. कलियुगात सर्वत्र भगवंत कुठे भेटेल याचसाठी ध्यास सुरू असतो. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी नामस्मरण हेच महत्त्वाचे माध्यम आहे असे प्रतिपादन ह भ प संगीता महाराज चव्हाण यांनी केले. धोंड्याच्या महिन्यात जावयाला मान असतो मात्र संवत्सरच्या महिलांनी आगळावेगळा अधिक मास साजरा करत भगवंतालाच भक्तीचा धोंडा खाऊ घातला आहे असेही त्या म्हणाल्या.
ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्व महिला भगिनींनी एकत्रित येत अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त ज्ञानेश्वरी सामूहिक पारायणाचे आयोजन केले होते.त्याची सांगता रविवारी करण्यात आली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी रामदासी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सुदामराव साबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त सौ दिपाली निलेश जोशी यांनी अधिक मास महात्म तर श्रीमती संगीता आबक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे सप्ताहभर वाचन केले.
ह भ प संगीता चव्हाण पुढे म्हणाल्या की,अधिक मास हा भगवान श्री हरि नारायण विष्णुचा महिना असून दर तीन वर्षांनी येत असतो.या महिन्यात जेजे चांगले कर्म पुण्य तप दान केले तर त्याच्या कुटुंबाला,समाजाला, स्वतःला,सर्व परिवाराला, सभोवतालच्या परिसराला अधिक फायदा मिळत असतो.
संवत्सर ही भूमी ऐतिहासिक पौराणिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेली असून दक्षिणगंगा काशी गोदावरी नदी येथून वाहते.पुत्र कामेष्टी यज्ञाचे जनक शृंग ऋषींची भूमी म्हणून संवत्सरची ओळख आहे.सर्व महिलांनी पुरुषोत्तम मासाचे आयोजन करून चांगला उपक्रम राबविला त्याबद्दल सर्व महिलांचे कौतुक करत देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदाची दोरी देखील एक महिलाच द्रौपदी मुर्मू सांभाळत असल्याची आठवण करून दिली.देवा सारखे सुंदर या जगात फक्त नामस्मरण आहे तेच आपल्याला सुखाचे दिवस दाखवत असतात. ज्ञानेश्वरी ही जगाची माऊली आहे.संत ज्ञानेश्वरांनी अखिल सांप्रदायाला एक करण्यासाठी ज्ञानेश्वरीचे लेखन केले, ते पवित्र स्थान देखील आपल्याच अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे आहे.आज समाजात व्याभिचार वाढत चालला आहे. सर्वांची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे आभासी जगाच्या माध्यमांनी बालकांपासून वयोवृद्धांनाही एक वेगळे वेड लावले आहे तेव्हा सज्ञान माता-पित्यांनी वेळीच आपल्या पिढीला यापासून वाचवले पाहिजे. अध्यात्मिक शांतीसाठी वाचन हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
याप्रसंगी दिपाली गायकवाड,अंजना साबळे,कविता लोखंडे,कविता वाळुंज, सुरेखा गायकवाड,सुरेखा नवाळे, नलगेताई,सविता सोमासे,सुमन संत, डोळसताई,मीना निकम,दामिनी गायकवाड,मिरा देवतरसे,सोनारताई, दवंगेताई,जनाबाई साबळे,बेबी मगर, सुनीता दिवाणे,आचारीताई,मिरा वाकचौरे,ज्योती घुले,सविता पावडे, कुसुम कोल्हे,स्वाती दरवडे,कल्पना साबळे,सारिका निकम,वैष्णवी दिवाणे,सुनीता नवाळे,अनिता शिंदे, मंदा वाळुंज,पांडवताई,अपूर्वा गायकवाड,जयश्री वाळुंज,सायली जोशी,भागवत निकम,काशिनाथ कहार,बालाजी आचारी,निवृत्ती मोरे, राजेंद्र नवाळे,लहू साबळे,नामदेव पावडे,गोकुळ गंगुळे,दत्तात्रय गायकवाड,यांच्यासह असंख्य भावीक उपस्थित होते.पुरणपोळी धोंड्याचा महाप्रसाद यावेळी वाटण्यात आला. शेवटी भागवत निकम यांनी आभार मानले.