
कोपरगाव🪐२९ एप्रिल : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच बालविवाह मुक्त भारत माझं गाव बालविवाह मुक्त गाव अभियान राबवणारे डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या प्रयत्नातून पोहेगाव येथील हा बालविवाह रोखण्यात यश आले असल्याचे डॉ. गावित्रे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.
यासाठी महिला बालकल्याण अधिकारी रूपाली धुमाळ मॅडम तसेच गटविकास अधिकारी दळवी साहेब, महिला समुपदेशक वैशाली झाल्टे मॅडम,अंगणवाडी सुपरवायझर लता येडेकर, ग्रामसेवक राजेंद्र टिळेकर, सरपंच अमोल ओताडे साहेब, अंगणवाडी सेविका उज्वला भालेराव, शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय गलांडे साहेब तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोराणे साहेब आदींचे सहकार्य लाभले.

पुढे डॉ. गावित्रे म्हणाले कि, सदर अल्पवयीन मुलीचा साखरपुडा झालेला होता व लग्नाची तयारी सुरू होती. माहिती मिळताच वरील टिम संबंधीत ठिकाणी जाऊन कुटूंबातील व्यक्तींबरोबर चर्चा घडवून ती अल्पवयीन असल्यामुळे लग्न केल्यास काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली व त्यांचे समुपदेशन करून सदर विवाह रद्द करून मुलगी 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे मुलीचे आई-वडील यांनी सांगितले.
18 वर्षाखालील मुलीचा व 21 वर्षाखालील मुलाचा विवाह करणे म्हणजे बालविवाह असून तो गुन्हा आहे, कमी वयात मुलीचे लग्न होऊन गर्भधारणा झाल्यास आई व बाळाच्या जीवीताला धोका होऊ शकतो, बाळाची वाढ कमी होऊ शकते त्यामुळे वय पूर्ण झाल्यावरच पालकांनी योग्य वेळ येताच विवाह करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राम बाल संरक्षण समितीसमोर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचे देखील लेखी घेण्यात आले असून,मुलीने देखील पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती डॉ. गावित्रे यांनी दिली.
गावात बालविवाह होऊ नये यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून यासाठी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची प्राथमिक जबाबदारी आहे या समितीने बालविवाह होत असल्यास त्वरीत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला माहिती देणे बंधनकारक व आवश्यक आहे.
यासाठी बालविवाह लावणाऱ्या पुरोहितांसह, मंडपवाले, आचारी छायाचित्रकार, वाद्यांची ऑर्डर घेणारे यांसह नातेवाईकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह प्रथा ही बालहक्क विरोधी असून बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2016 नुसार असे बालविवाह बेकायदेशीर ठरतात. यासाठी 1098 किंवा 112 या टोल फ्री क्रमांकावरून माहिती दिल्यास तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जाते.
राज्यात मागील सहा वर्षात 5421 बालविवाह थांबविण्यात यश आले असून 401 एफ आय आर दाखल करण्यात आले आहे.अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात अनेक सामुदायिक विवाह आयोजित केले जातात यामध्ये देखील बालविवाह मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते याबद्दल आपल्याला माहिती मिळाल्यास त्वरित 1098 या नंबर वरती कॉल करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी केले आहे.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिले आहेत.निर्मल भवन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे,सहआयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.