Homeकोपरगावस्वकर्तुत्वाने घडलेलं व्यक्तिमत्व - माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे

स्वकर्तुत्वाने घडलेलं व्यक्तिमत्व – माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे

वाचावेसे असे काही….पुस्तक परीक्षण….

कोपरगाव : – माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी देशाबरोबरच, राज्याच्या राजकारणात तसेच विकासात सातत्याने भर घातलेली आहे. सहकारी साखर कारखानदारीत त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकल्प जन्माला घालून ते जोपासले त्यातून सभासद शेतकऱ्यांचा व परिसराचा कायापालट करत अनेकांना संजीवनी दिली आहे. एक रुपयाच्या खर्चात शेतकऱ्याला तीन रुपये कसे मिळतील हा विचार त्यांनी आयुष्यभर जोपासला. आताचे एआय तंत्रज्ञान त्यांनी १९७०-१९७५ च्या काळात कितीतरी अगोदरच संजीवनी परिसरात आणून ठेवले होते. शेतकऱ्यांची शेती म्हणजेच काळ्या आईच्या सेवेत स्व. शंकरराव कोल्हे जीवाचे रान करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल, हा ध्यास घेत शेतकऱ्यांना आधुनिक विचार तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय शेती करारासंदर्भात निर्माण झालेल्या स्पर्धेत भारतीय शेतकऱ्यांनी काय केले म्हणजे त्यांचा निभाव लागेल यासाठी वेळोवेळी समाज जागरूकता केली आहे. प्रश्न कुठलाही असो त्यावर ते काम करून सतत यश मिळवायचे. जिरायती भागातील अल्पभूधारक शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे, हे स्वप्न शंकरराव कोल्हे यांनी पाहिले आणि त्याची सोडवणूक देखील केली. त्यांनी परदेशात उच्च कृषी शिक्षण घेतले, ते विकसित देशातील बडे उद्योजक नक्कीच बनले असते पण भारत आणि भारतीय शेतकरी यासाठी त्यांनी येसगावची आठवण कधीच सोडली नाही.

१९५० ते २०२२ या ७० वर्षाच्या संघर्षात स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्यातील ज्ञान अपडेट करत येथील शेतकऱ्यांच्या शेतीसह सहकारी कारखानदारीला वेळोवेळी योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. स्व. शंकरराव कोल्हे हे सर्वस्पर्शी नेते होते, त्यांचा प्रत्येक क्षेत्राचा बारकाईने अभ्यास होता.

अहिल्यानगर जिल्हा हा नेतृत्वाची खाण. येथे सहकाराची पाळेमुळे रूजली. सहकारी तत्त्वावरील साखर कारखानदारी राज्यात सर्वप्रथम या जिल्हयात बहरली. या जिल्हयात सहकार क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती राज्याच्या राजकारणांत निश्चितच चमकल्या असत्या मात्र कालपरत्वे त्यांना तशी संधी मिळाली नाही पण या मातब्बर राजकारणी नेतृत्वाने आपापले तालुके समृध्द करत त्या भागाचा विकास केला त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नांव अग्रहक्काने घेतले जाते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या जीवनाचा संघर्ष मोठा आहे. त्यांनी सहकारक्षेत्रात केलेले कार्य राज्यासह देशाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग २ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. काळाच्या पुढे जात विचार करणारे नेतृत्व म्हणजे शंकरराव कोल्हे होय. संजीवनी सहकारी साखर कारखान्यात त्यांनी काळाच्या कितीतरी अगोदर उस कारखानदारीतील प्रयोगात्मक प्रकल्प सहकाराच्या माध्यमातुन उभे केले, यथार्थपणे चालविले, सभासद शेतक-यांची उन्नती साधली आणि उद्याच्या येणा-या अनंत पिढयांसाठी मार्गदर्शनाचा ठेवा निर्माण केला त्यामुळे स्व. शंकरराव कोल्हे व्यक्ती नसुन एक विचार आहे हेच यातुन वाचकांसमोर उभे राहते.

संपादक महेश मधुकर जोशी, संकलक लेखक वीरेंद्र व मयुर मधुकर जोशी या तिघा भावांनी गेल्या वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग १ पुस्तक प्रकाशित केले होते. याही वर्षी (१२ मार्च २०२५) माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विविध वर्तमानपत्रात लिहीलेल्या लेखांचे संकलन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग २ या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

सध्याचा काळ मुक्त अर्थव्यवस्थेचा आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करार आणि शेती यात भारतीय शेतक-याला संरक्षण कसे मिळेल हा हेतु स्व. शंकरराव कोल्हे यांनी कितीतरी अगोदर मांडला त्यात विकसीत विरुध्द विकसनशील लढाईत आपण टिकु की टिकणार नाही आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती दिली.

प्रस्तृत पुस्तकात स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांची नेमकी दिशा काय आहे याचा बोध होतो. महामंडलेश्वर सिध्देश्वर देवस्थान मंजुर (कोपरगाव) येथील दत्तात्रेयरत्न शिवानंदगिरी महाराज यांची प्ररेक प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. काम हाच परमेश्वर या स्वभावगुणांने शंकरराव कोल्हे यांनी अध्यात्मापेक्षा कामाला प्राधान्य दिले आहे. कामात अध्यात्माचा राम शोधला. संजीवनी उद्योग समूह आणि त्याला सद्यस्थितीत मार्गदर्शन करणारे नेतृत्व आताची कार्यरत असणारी तिसरी पिढी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा अधिक समृद्धीतेने पुढे नेऊन समाज मनाचे भले करण्यावर सातत्याने भर देत आहे त्यांचा सहकार समृद्धता आणि कार्य तत्परतेचा यज्ञ असाच पुढे सुरू राहावा, त्याला परमेश्वरी पाठबळ मिळत राहो असेही स्वामी शिवानंदगिरी महाराज यांनी म्हटले आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेती आणि पाणी या प्रश्नांवर सातत्याने लढे दिले, स्वतःच्या सरकारविरूध्द रस्त्यावर येत संघर्ष केला त्याची उदबोधक रंगीत छायाचित्रे त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे शेती कर्जाचे व्याज कमी व्हावे यामागणीसाठी शेतक-यांचा नेलेला रूम्हणं मोर्चा यातुन स्व. शंकरराव कोल्हे वाचकाच्या डोळयासमोर उभे राहतात. हस्ताक्षराने मनुष्याचा स्वभाव कळतो, तिळवणी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा वाचनालयास स्व. शंकरराव कोल्हे यांनी ३० डिसेंबर २००७ रोजी भेट दिली त्यावेळच्या लिखीत संदेशामुळे साहेबांचे हस्ताक्षराची कल्पना येते.

स्व. शंकरराव कोल्हे यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतीक, सहकार, बँकींग आदी क्षेत्रात काम करतांना सहकारी दुध संघांना सरकारी संरक्षणाची आवश्यकता, खुली अर्थव्यवस्था आणि विकसनशील देश, आर्थीक महासत्तेसाठी जिददच हवी, शेतक-यांच्या आत्महत्या पॅकेज देवुन थांबणार नाही, जिल्हा बँकेमुळे कृषी क्रांती, अडचणींच्या शर्यतीतील साखर उद्योग, सहकारासमोर आव्हान खाजगीकरणाचे, ज्येष्ठांच्या भावना, अमृत महोत्सवी महाराष्ट्राचे विधीमंडळ, दुष्काळ निवारण्यासाठी शेततळी महत्वाची, शेती सहकार आणि ऋणानुबंध, आठवणीतले अधिवेशन याविषयी लिहीलेल्या लेखांची समग्र माहिती वाचावयास मिळते. याशिवाय स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहचारीणी श्रीमती सिंधुताई शंकरराव कोल्हे यांनी साहेबांविषयी लिहीलेल्या आठवणींचे संकलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी यथार्थपणे मांडले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे माजी महाव्यवस्थापक वि. पा. राणे, विवेक पुरंदरे, महेश जोशी, प्रा. रतनलाल सोनाग्रा, महादेव कुलकर्णी, सीताराम चांडे यांनीही स्व. शंकरराव कोल्हे यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलु आपल्या लेखनातुन या पुस्तकात मांडले आहे. काशिनाथ वहाडणे, रमेश राहणे, हेमचंद्र भवर, राजेंद्र सालकर, मनोज जोशी, शरद थोरात यांना स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबददल आलेल्या अनुभवांचे विचार स्वतःच्या शब्दात व्यक्त केले. त्यामुळे हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या साई संजीवनी सहकारी बँक व संजीवनी पतसंस्था व्यवस्थापन, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सदरचे पुस्तक संग्रहार्थ रहावे म्हणून आपल्या संचालकांना भेट दिले आहे. मधुशोभा प्रकाशनने अत्यंत सुबक मांडणी करत पुस्तक प्रसिध्द करून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांचे २४ मार्च १९२९ जन्मापासुन ते २०२२ मृत्युपर्यंतचा प्रवास सविस्तर व्यक्तीगत जीवनपटनातील महत्त्वाचे टप्पे त्याची माहिती यामुळे वाचकांसाठी आणखी रोचक झाले आहे.

काळाचा महिमा मोठा अलौकिक असतो प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या त्याच्या कर्मानुसार या भुतालावर जीवन व्यतीत करावे लागते, ते व्यतीत करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते मात्र त्यात काही व्यक्ती हाताच्या बोटावर मोजणे इतक्या क्वचितच असतात त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा समावेश आहे. शंकरराव कोल्हे यांनी जीवनात कधीही आड पडदा न ठेवता काम केले. स्पष्टवक्ते ही त्यांची ख्याती होती. वीरेंद्र जोशी यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांची विचारधारा पुस्तकाच्या रूपाने समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.

           जयंत देशपांडे, संपादक ज्ञानधारा, अहिल्यानगर.

मधूशोभा प्रकाशन, मयूर फीचर्स, कापड बाजार, कोपरगाव.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग-२
पाने १४२
प्रकाशन क्रमांक ३

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!