
कोपरगाव : लहान मुलांचे वयाबरोबर शरीररचनेची त्याचप्रमाणात वाढ होऊन उद्याची युवा पिढी सुदृड व निरोगी असावी. साथीच्या रोगांपासून स्वसंरक्षणाइतकी अंगी प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी. या उद्देशाने मा आमदार श्री आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नातुन कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात तसेच वाड्या वस्त्यांवरही खेळाचे साहित्य देण्यात येऊन बसविण्यात आले आहे. मात्र, आज त्या साहित्याबरोबर पावसाचे पाणी खेळ खेळत असल्याचे चित्र दिसत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाउंड च्या आत गावठाण अंगणवाडी शाळा क्र १ ची भव्य शासकीय इमारत उभी असून, त्याठिकाणी वय वर्ष ०ते ४ पर्यंतची मुले अंगणवाडीत येत असतात. मात्र, त्या इमारतीसमोर पावसाचे पाणी जमा होऊन तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. लहान लहान बालकांना त्या पाण्यातून ये – जा करतांना कसरत करावी लागत आहे. तेथेच लगत असलेल्या मोकळ्या जागेत खेळाचे साहित्य बसविलेले आहे,अक्ष:रशा हे चिमुकले मुलं त्या ठिकाणी खेळ खेळायला जातात. ह्या पावसाच्या पाण्यामुळे लहान मुलांना साथीचे आजार होण्याची दाट शक्यता असून संबधितांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन वेळेत बंदोबस्त करावा अशी मागणी त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे.

१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहन कार्यक्रम साजरा करुन विद्यार्थ्यांना त्या नंतर सुट्टी दिली जाते. मात्र, तद्नंतर शाळेला सुट्टी असल्याने सदर ठिकाणी शिक्षक तर नाहीच नाही पणं विद्यार्थी सुद्धा फिरकत नाही.मात्र, अंगणवाडीतील मुलांना शाळेत यावेच लागते. कारण, मुलांना शाळेत येण्याचे लागलेले वळणं तसेच राहावे या उद्देशाने त्यांना सुट्टी दिली जात नाही. सर्वत्र होत असलेल्या अवकाळी पावसामुळे सदर अंगणवाडी इमारतीसमोर पाणी साचून तळ्याचे स्वरुप निर्माण होते व साचत असलेल्या पाण्यामधून लहान चिमुकल्यांना अंगणवाडीत ये- जा करतांना कसरत तर करावी लागत आहेच या चिमुकल्यांबरोबर खेळाच्या साहित्याबरोबरही हे पावसाचे पाणी खेळ खेळत आहे. तरी आमदार साहेबांचा उद्देश साध्य होईपर्यंत तरी संबंधितानी वेळीच लक्ष द्यावे अशी ग्रामस्थामधून मागणी होत आहे.