
कोपरगाव:-महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या निर्देशानुसार दिनांक १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार कोपरगाव येथील श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव यांच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश अल्पसंख्याक नागरिकांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क, त्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजना तसेच सामाजिक समता व बंधुतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.
या निमित्ताने महाविद्यालयातील विविध वर्गखोल्यांमध्ये प्रा. डॉ. सीमा आर. दाभाडे आणि प्रा. डॉ. संतोष पवार यांनी जाऊन व्याख्याने दिली. आपल्या व्याख्यानातून त्यांनी भारतीय संविधानातील अल्पसंख्याकांचे अधिकार, शिक्षण व सामाजिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, तसेच समावेशक समाजनिर्मितीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व विषयासंबंधी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमात शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अल्पसंख्याक हक्कांविषयी सकारात्मक जाणीव निर्माण झाली तसेच सामाजिक सलोखा व संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. माधव सरोदे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांसह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.