Homeकोपरगावप्रशासकीय यंत्रणेकडुन सामान्य नागरिकांची पिळवणूक कधी थांबणार ? - अजिनाथ ढाकणे

प्रशासकीय यंत्रणेकडुन सामान्य नागरिकांची पिळवणूक कधी थांबणार ? – अजिनाथ ढाकणे

कोपरगाव (प्रतिनिधी ):- कोपरगाव तहसील व पंचायत समिती कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या सेतू केंद्र आणि झेरॉक्स दुकानांमध्ये नागरिकांकडून विविध सेवांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची तक्रार समोर आली आहे. शासनाने विविध सेवांचे दर निश्चित केलेले असतानाही संबंधित सेतू केंद्र व झेरॉक्स दुकानांमध्ये दरपत्रक लावण्यात आलेले नसल्याचा आरोप गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टने केला आहे. या प्रकाराला आळा घालून नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष अजिनाथ गोरखनाथ ढाकणे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, तहसील व पंचायत समिती कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यामध्ये गरीब, सर्वसामान्य तसेच अशिक्षित नागरिकांची संख्या मोठी आहे. शासकीय योजनांचे अर्ज भरणे, विविध दाखले काढणे, अर्जांची विक्री, करावयाच्या प्रक्रियेसाठी लागणारे अपलोडिंग तसेच कागदपत्रांच्या संगणकीय प्रिंट काढून देणे अशा अनेक कामांसाठी नागरिकांना सेतू केंद्र व झेरॉक्स दुकानांचा आधार घ्यावा लागतो.

मात्र, शासनाने या सेवांसाठी दर निश्चित केलेले असतानाही संबंधित दुकानांमध्ये दरपत्रक लावण्यात आलेले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब व अशिक्षित नागरिकांना नेमके किती शुल्क द्यायचे, याची माहिती नसल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे ट्रस्टने निदर्शनास आणून दिले आहे.

शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने त्यांच्यावर मानसिक आणि आर्थिक ताण निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरांची अंमलबजावणी होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्नही या निवेदनाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

त्यामुळे तहसीलदारांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित सेतू केंद्र व झेरॉक्स दुकानदारांना शासनाने निर्धारित केलेले दर स्पष्टपणे दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारणी होत असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टने केली आहे.

या निवेदनाच्या प्रती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे आणि विधानपरिषदेचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.

आता तहसील प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते आणि सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी काय पावले उचलते, याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!