
कोपरगाव : – आपला देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. या भुमितील असंख्य स्वातंत्र्यसैनिक, चळवळीत काम करणा-या जहाल व मवाळवादी नेत्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यांसाठी अतोनात कष्ट घेतले, १९२० सालानंतर भारतात गांधी पर्व सुरू झाले देशातील स्वातंत्र्यचळवळीची सुत्रे गाधींजींनी ताब्यात घेतली होती. याच पर्वात सहकारातील अनुभवी व तज्ञ नेते, माजीमंत्री तथा साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष, सहकारमहर्षी स्व. शंकरराव गेनूजी कोल्हे हे शेतकरी कुटूंबातील व्यक्तीमत्व.

प्राथमिक शिक्षणाचे धडे येसगांवात गिरवले आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथून उच्च शिक्षण घेतले. ग्रामीण भारतातील शेतकरी व कष्टकरी यांच्या जीवनांची वाताहात सुरू होती. त्यातच ते परदेशी युएसए (अमेरिका), युरोप येथे कृषि उच्च शिक्षणासाठी गेले. देश विदेशातील शिक्षणातुन मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर ते परदेशी स्थायीक होण्याचा विचार करत होते मात्र वडील गेनूजी पाटील कोल्हे यांनी त्यांना येसगांव येथील काळ्या आईला कसण्यासाठी आणि सावकाराकडे गहाण पडलेल्या जमिनी सोडवुन घेण्यासाठी बोलावुन घेतलं., सुटाबुटातील शंकरराव धोतर, शर्ट, टोपी या पेहरावात आयूष्यभर खुलून राहिले.
शासनाने सहकार विषयक १९०४ मध्ये व त्यानंतर वेळोवेळी यासंदर्भात कायदे पास करून त्यात सुधारणा केल्या अन् सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढत गेली. सहकारी चळवळीद्वारा देशाच्या ग्रामिण भागाच्या विकासाला साकार रूप दिले जावु लागले.
१९५० ते १९६० या दशकातच स्व. शंकररावजी कोल्हे यांचा राजकीय प्रवास येसगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासुन झाला, कोपरगांव शेतकरी विकास मंडळ या तालुकास्तरावरील संस्थेच्या अध्यक्षपदावर ते निवडुन आले होते. याचकाळांत त्यांनी कोपरगांव सहकारी साखर कारखान्यांत अध्यक्ष म्हणुनही काम पाहिले होते. तसेच या दशकात पुर्वीचा संजीवनी (टाकळी) व आताचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या निर्मीतीचा विचार प्रवाहही शेतक-यांमध्ये सुरू झाला होता.
१९६२ मध्ये ते पुर्वीचा संजीवनी (टाकळी) आताच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष झाले होते. कोपरगांव तालुक्याचे पहिले सभापती म्हणूनही त्यांनी कम केले. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात त्यांनी १९७२ मध्ये अपक्ष निवडणुक लढवुन पाउल ठेवले. १९७२ ते २००४ पर्यंत १९८४ ते १९८९ चा अपवाद वगळता ते सलग कोपरगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. बँकेच्या माध्यमांतुन होणारा शेतीचा कर्ज पुरवठा महागला होता त्यासाठी त्यांनी २३ डिसेंबर १९७८ रोजी शेतक-यांचा विशाल मोर्चा थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्य कार्यालयावर नेला, हातात रूम्हणं घेवुन संतप्त शेतकरी रिझर्व्ह बँकेवर धडकले तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे मोर्चाला सामोरे आले आणि देशातील शेतक-यांच्या शेती कर्जात दीड टक्के व्याजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. हे शंकरराव कोल्हेंचे देशपातळीवरील यश होय.
आताच्या काळी असलेली शालेय पोषण आहार योजना स्व. शंकरराव कोल्हे यांनी मे १९७९ मध्ये महिनाभर गावरान तुपातील लापशी वाटप योजना तालुक्यातील जवळके-पोहेगांव पंचक्रोशीतील अकरा गावात राबविली लहान बालकांची महिनाभर बालआरोग्य तज्ञांच्या निगराणीखाली तपासणी करून त्यांच्यातील कुपोषण दुर केले.
दुधाला रास्त भाव मिळावे म्हणून संजीवनी येथे ३० ऑगस्ट १९८७ रोजी राज्यव्यापी शेतक-यांचा मेळावा घेवुन दुध
१९९० ते १९९२.९३ पर्यंत त्यांनी महसुल, सहकार, परिवहन, कृषि व फलोत्पादन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा इत्यादी खात्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून कारभार सांभाळला होता. स्व. शंकररावजी कोल्हे यांनी राजकीय, कृषि, सहकार, शिक्षण, व सामाजिक सेवा इत्यादी अनेकविध क्षेत्रात काम केलेले असुन त्यांचे व्यक्तीमत्व विचारांचा सर्वांगीण ठसा त्यांच्या कार्यातुन स्पष्टपणे उमटलेला आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. सुधाकरराव नाईक, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार इत्यादी नेत्यांचा वैचारिक वारसा त्यांनी जपला, अर्थतज्ञ डॉ धनंजराव गाडगीळ, सहकारमंत्री वैकुंठभाई मेहता यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सात दशकातील सहकार कार्याचा वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट पुणे येथील वार्षीक सभेत थेट गौरव केला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्यस्तरावर मराठा सन्मान पुरस्कार देवुन त्यांच्या विकास कार्याचा गौरव केला.
स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८९.९० ते २००४ या कालखंडात आमदारकीच्या माध्यमांतुन कोपरगांव विधानसभा मतदार संघात स्थानिक विकास निधीच्या माध्यमातुन सुमारे १३ कोटी रूपये खर्चाची कामे पुर्ण केली. याशिवाय आमदारकीच्या काळात विविध शासनाकडुन जनसुविधा योजनांसाठी कोट्यावधीचा निधी आणुन विकास साधला.
बदलत्या मुक्त अर्थव्यस्थेत साखर उद्योग टिकला पाहिजे यासाठी त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यांत साखरेबरोबरच विविध रासायनिक उपपदार्थ निर्मीती करण्याचे पाउल उचलले, इथेनॉल, सहवीज निर्मीती, हैड्रोजन, बायोगॅस, औषध निर्मीती हे त्यांचे सहकारातील पहिलेच प्रयोग त्यांनी १९८०, १९९० च्या दशकात यशस्वी करून त्याचा पाया घातला. नातु विवेक कोल्हे यांनी सहकार क्षेत्रातील देशातील पहिला बायो सीएनजी प्रकल्प सुरू करून आजोबांची विचार कार्यप्रेरणा आत्मसात केली.
शेतक-यांच्या शेतीसाठी पाणी हा जीवन मरणाचा प्रश्न असल्यांने त्यासाठी काळाच्यापुढे धाडसांने दोन पावलं पुढे टाकणे तुटीच्या खो-यातील पाणीप्रश्न तसेच नगर नाशिक विरुध्द मराठवाडा पाटपाण्याचा संघर्ष सोडविण्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा सातत्यांने ध्यास शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर जपला आणि पाटपाण्यासाठी स्वतःच्या सरकारविरुध्द रस्त्यावर उतरून संघर्ष आंदोलने केली.
उर्ध्व गोदावरी खो-यातील कडवा, आळंदी, वाघाड, पालखेड, काश्यपी, मुकणे, वालदेवी, गौतमी, मुकणे उंचीवाढ, भाम, भावली, वाकी, निळवंडे आदी धरणांची कामे मार्गी लावुन ती कालव्यासह पुर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे सरकार जरी सत्तेत असले तरी त्यांनी पाटपाण्याचा लढा रस्तारोको, उपोषण, सत्यागह, जेलभरो आंदोलन, खडा सत्याग्रह, सर्वपक्षीय रस्तारोको, मुकणे धरण गेट बंद अशी नानाविध आंदोलने करून आयूष्यभर त्यासाठी संघर्ष केला. नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी किकवी धरण नव्यांने प्रस्तावीत करून प्रत्येक कुंभमेळ्यात त्याचा सातत्यांने पाठपुरावा देखील केला.
उर्ध्व गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी वाढविण्यासाठी पश्चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामाला सन २००० मध्ये विधीमंडळात मंजुरी घेवुन ठेवली., भाजपाच्या नेत्या व तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी विधीमंडळ स्तरावर या कामाला चालना देवुन वळण बंधारे हाती घेण्यासाठी आवश्यक निधीचा पाठपुरावा करत त्याला मुर्त रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. जिरायती भागातील शेतक-यांचे स्वप्न असलेला निळवंडे धरण व कालव्यांचा प्रश्न मार्गी लावत डाव्या कालव्याच्या पाण्याचे जलपूजन त्यांनी घडवून आणले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना खाजगीकरण उदारीकरण व जागतिकीकरणाच्या स्पर्धेत कसा टिकुन राहिल यासाठी त्यांनी साखर कारखानदारीवर जीवापाड प्रेम केले होते. शेतक-यांचे प्रति एकरी उसाबरोबरच अन्य पीक उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे शेती प्रयोग त्यांनी केले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना सातत्यांने नाविन्यतेचा ध्यास असे, त्यांनी कोपरगांव परिसराला शैक्षणिक हब बनविण्यांचा पुर्वीपासूनच विडा उचलला होता की, काय? म्हणुन त्यांनी सहजानंदनगर-शिंगणापूर परिसरात संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कुल (१९७८), संजीवनी एज्युकेशन सोसायटी (१९८२), के. बी. पी. पॉलेटेक्नीक कॉलेज (१९८२), संजीवनी इंजिनियरींग कॉलेज (१९८३), संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल (१५.९.१९९२), एकलव्य आदिवासी आश्रमशाळा टाकळी (२०००), संजीवनी सैनिकी स्कुल (२०००), कॉलेज ऑफ फार्मास्क्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी. फार्मसी-२००३), संजीवनी इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी अँड रिसर्च (२००३) साईबाबा कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड. आणि डी. एड. कॉलेज-२००४), संजीवनी इंटरनॅशनल स्कुल खारघर मुंबई (२००५), संजीवनी आर्टस, कॉमर्स, सायन्स सिनीयर कॉलेज (२०१२), संजीवनी अकॅडमी (सी.बी.एस्सी पॅटर्न २०१२), मास्टर ऑफ विझनेस अॅडमिनीस्ट्रेशन स्कुल (एम.बी.ए-२०१३), संजीवनी ज्युनियर कॉलेज (२०१४), संजीवनी आर्टस, कॉमर्स, सायन्स ज्युनियर कॉलेज वैजापुर (२०१७) या शिक्षण संस्था स्थापन करून त्यातुन शैक्षणिक आलेख सतत झळकवत ठेवला.
देश विदेशातील टॉप क्वॉलीटीच्या पदावर तसेच अंतराळ संशोधनात जगविख्यात असलेल्या नासा संस्थेत काम करणारे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे विद्यार्थी ही शैक्षणिक गुणवत्ता ग्रामिण भागातुन साता-समुद्रापार केली आहे.
सहकारातुन शेतक-याला समृध्द करण्यांसाठी त्यांनी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ मर्यादित, कोपरगांव (१९५३) पुर्वीचे कोपरगांव तालुका विकास मंडळ (टीडीबी) सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर (१९६०) वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे (१९.११.१९७५) नॅशनल हेवी इंजिनियरींग लि, पुणे (१९७५) संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल, खिर्डीगणेश (१९७८), महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे (१९८९) अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (०३.१२.१९७५) सुवर्णसंजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापुर (२०.१०.१९७६) गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर (२०.०१.१९७६) संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामिण विकास विश्वस्थ संस्था, सहजानंदनगर (२६.०७.१९७६) कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत, कोपरगांव (१९७५) संजीवनी एज्युकेशन सोसायटी, सहजानंदनगर (१९८२) यशवंत कुक्कुट सहकारी पालन व्यावसायिक संस्था लि, येसगांव (१९८६) संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल, सहजानंदनगर (१५.०९.१९९२) संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव (१५.०६.१९८४), साई संजीवनी सहकारी बँक लि, कोपरगांव (१९९६), संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था लि, शिंगणापुर (१९९६) या सहकारी संस्था स्थापन करून त्यांनी रोजगार स्वयंरोजगाराला चालना दिली. असंख्य कुटूंबांचे संगोपनही केले.आर्युवेदा कॉलेजची (२०१७) स्थापन करत वैद्यकीय शिक्षण संधी निर्माण केल्या. दुस-या व तिस-या पिढींने स्व. शंकरराव कोल्हे यांचा समाज विकासाचा वारसा जपत या परिसरात संजीवनी आर्युवेदा कॉलेज मार्फत मतदार संघाचे आरोग्य अबाधीत राखण्याचा विडा उचलला आहे.
जगप्रसिध्द साईबाबा संस्थान शिर्डीच्या माध्यमांतुन त्यांनी कमी पैशात प्रगत आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. साईबाबा संस्थानचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अहिल्यानगर जिल्हा, महाराष्ट्र राज्याबरोबरच भारत देशात तसेच विदेशात आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या काळात अनेक विकासाचे निर्णय झाले, त्याचा अनेकांना फायदा होत आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल उभारून आरोग्याच्या सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी स्व. कोल्हे यांनी संस्थानचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून मोठे काम केले. नांदुर्खी परिसरात ४०० खाटांचे हॉस्पीटल निर्माण करण्यासाठी प्रस्तावाला मुर्त रूप दिले.
जागतिकीकरणात डंकेल प्रस्ताव, गॅट करार, आंतरराष्ट्रीय व्यापार शेती करारात भारतीय शेती आणि शेतक-याला बळ देण्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अॅग्रीकल्चरच्या (२०००) माध्यमांतुन आंतरराष्ट्रीय पटलावर शेतक-यांचे प्रश्न मांडुन त्याची सोडवणुक केली., देश व राज्य पातळीवर त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले.
सहकाराचा कल्पवृक्ष म्हणजे संजीवनी, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि बळीराजाला ख-या अर्थाने संजीवनी देवुन समृध्द करण्यांत कोल्हेंचा हातखंडा होता., असा शेतकरीपुत्र, सहकाराचा परिस सर्वांच्या आठवणींचा भाग आहे. त्यांची दुसरी आणि तिसरी स्व. शंकरराव पिढी आता त्यावर कळस चढवून समाजाच्या वेदना जाणून घेवुन त्या कमी कशा होतील हा जाणिवपुर्वक प्रयत्न करत आहेत.
ज्ञानेश्वर परजणे, व्हाईस चेअरमन,
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर (कोपरगाव)