
कोपरगांव:- घटनेचे शिल्पकार महामानव, थोर विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनी अहिल्यानगर जिल्हयातून शिक्षणाचा पाया घालून देणारे महात्मा ज्योतिबा फुले तसेच परकीयांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र्य मिळवून देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतं जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
तालुक्यातील कुंभारी येथे भिमसैनिक यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी ग्रामपंचायत आजी – माजी सरपंच, सदस्य सोसायटीचे आजी – माजी चेअरमन,व्हा.चेअरमन सर्व संचालक महिला, ग्रामस्थ व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी श्री.निळकंठ सर यांनी प्रास्तविकात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपुर्ण माहिती देत या महामानवाच्या जयंतीमुळे त्यांच्या कार्याला उजाळा मिळतो असे सांगितले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बागुल सर उपस्थित पालकांशी संवाद साधत म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील लोकशाही समृध्द करण्यांत महत्वाचे योगदान आहे. शिक्षण घ्या, जबाबदार नागरिक बना आणि संघटीत व्हा हा त्यांनी दिलेला नारा आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला महत्व देत अनेक पिढया घडविण्यांचे काम केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत संघर्ष करत भारतीय संविधानाची निर्मीती केली असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
उपस्थितांचे आभार शेवटी विकास खळे यांनी मानले.