
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश
कोपरगाव ः- प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी प्रवेश परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण १५ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलच्या दिव्या सुधाकर जाधव (रँक II) व योगेश्वरी विशाल देशमुख( रँक IV) समावेश आहे. या शाळेने जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगीरी केली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी या दोन्ही विद्यार्थीनी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी हि प्रवेश परीक्षा घेतली जाते. स्पर्धात्मक व गुणवत्ताधारित असलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, गणितीय कौशल्य, तार्किक विचारशक्ती आणि शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेतली जाते. यंदा आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमधून या दोन्ही विद्यार्थीनींची निवड झाली.
या निवडीस पात्र ठरलेली दिव्या जाधव म्हणाली, आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक सुविधा उत्तम आहेत. गुणवत्तापूर्ण अध्यापन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मूल्याधिष्ठित शिक्षणावर विशेष भर दिला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असते.
संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल तसेच प्राचार्य नामदेव डांगे यांनी या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.