Homeकोपरगावग्रामीण भागातून ग्रँडमास्टर घडविण्याचा संकल्प, ‘आमदार विवेकभैय्या कोल्हे चषक’ बुद्धिबळ स्पर्धेची उत्साहात...

ग्रामीण भागातून ग्रँडमास्टर घडविण्याचा संकल्प, ‘आमदार विवेकभैय्या कोल्हे चषक’ बुद्धिबळ स्पर्धेची उत्साहात सांगता

६ जिल्हे, २५ तालुक्यांतील ६०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; धानेधर आयुष, शिंदे वेदांत, ओम काळे व सार्थक शिंदे गटविजेते

कोपरगाव :- चौसष्ट घरांच्या पटावर बुद्धिमत्ता, संयम, एकाग्रता, नियोजन आणि निर्णयक्षमतेची कसोटी पाहणाऱ्या आमदार विवेकभैय्या कोल्हे चषक राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा २०२६ ची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस अँड स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संत जनार्दन स्वामी आश्रम, पुणतांबा फाटा, कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला राज्यातील ६ जिल्हे व २५ तालुक्यांमधून ६०० हून अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ४० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने दोन दिवस कोपरगाव परिसर बुद्धिबळमय झाला.

रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी भक्तनिवास क्रमांक २ येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली. तसेच आगामी काळात युवकांनाही या स्पर्धेत सहभागी करून बुद्धिबळाला आणखी व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

आमदार कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि बुद्धिबळ खेळाची आवड अधिक व्यापक व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. बुद्धिबळामुळे विचारशक्ती, संयम, नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित होते. कोपरगावच्या मातीतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तसेच ग्रँडमास्टर घडावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.

धानेधर आयुष, शिंदे वेदांत, ओम काळे आणि सार्थक शिंदे विजेते
स्पर्धेतील विविध गटांमध्ये खेळाडूंनी अत्यंत चुरशीच्या लढती दिल्या. अखेर १२ वर्षे गटात धानेधर आयुष, १४ वर्षे गटात शिंदे वेदांत, १९ वर्षे गटात ओम काळे आणि खुल्या गटात सार्थक शिंदे यांनी विजेतेपद पटकावले. लहान वयातील खेळाडूंची परिपक्वता, युवा खेळाडूंच्या आक्रमक रणनीती आणि खुल्या गटातील अनुभवी खेळाडूंच्या अचूक चालींमुळे स्पर्धेतील सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगले.

स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल ६२ रोख पारितोषिके आणि १३२ चषक ठेवण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंना कोपरगावमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.

‘बुद्धिबळ म्हणजे विचारांना धार देणारा बौद्धिक खेळ’
स्पर्धेचे उद्घाटन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी त्यांनी बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून विचारशक्तीला धार देणारा बौद्धिक खेळ असल्याचे सांगितले.योग्य वेळी योग्य चाल कशी चालायची, हे बुद्धिबळ शिकवते. प्रत्येक चाल खेळताना पुढील परिणामांचा विचार करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संयम, एकाग्रता, नियोजन आणि निर्णयक्षमता विकसित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार स्पर्धांचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे, असे रेणुकाताई कोल्हे यांनी सांगितले.

अर्जुन पुरस्कारप्राप्त ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्या प्रवासाचा गौरव
स्पर्धेच्या निमित्ताने अर्जुन पुरस्कारप्राप्त ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी यांच्या यशस्वी आणि संघर्षमय प्रवासाचा विशेष गौरव करण्यात आला. विदित गुजराथी यांच्या यशामागील कुटुंबीयांच्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांना मानपत्र प्रदान करून आमदार विवेकभैय्या कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संतोष गुजराथी यांनी विदित यांच्या बालपणापासूनच्या बुद्धिबळ प्रवासातील विविध टप्पे उपस्थितांसमोर उलगडले. लहान वयात निर्माण झालेली बुद्धिबळाची आवड, सातत्यपूर्ण सराव, विविध स्पर्धांमधील अनुभव, विजय-पराजयातून घेतलेले धडे आणि कुटुंबाची खंबीर साथ याबाबत त्यांनी अनुभव कथन केले.

केवळ प्रतिभा असून चालत नाही त्या प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी सातत्य, शिस्त, मेहनत, योग्य प्रशिक्षण आणि कुटुंबाचे प्रोत्साहन आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी युवा खेळाडू व पालकांना दिला. त्यांचा संवाद उपस्थितांसाठी विशेषतः प्रेरणादायी ठरला.

२०२० पासून स्पर्धेची परंपरा
संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस अँड स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने सन २०२० पासून ‘आमदार विवेकभैय्या कोल्हे चषक’ बुद्धिबळ स्पर्धेचे नियमित आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी, स्पर्धात्मक अनुभव आणि आत्मविश्वास मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे.

आज या पटावर खेळणाऱ्या लहान मुलांपैकी एखादा खेळाडू उद्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकतो. योग्य प्रशिक्षण, स्पर्धेचा अनुभव, पालकांचे प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण सराव मिळाला, तर कोपरगावमधूनही ग्रँडमास्टर घडू शकतो, असा विश्वास आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, प्राचार्य राजेंद्र पानसरे, डॉ. संतोष गुजराती, डॉ. निकिता गुजराती, नगरसेवक संतोष शिंदे, संजय उदावंत, डॉ. दीपक नाईकवाडे, संजीव बोरावके, राजीव बोरावके, तिलक अरोरा, किशोर टिळेकर, राजेंद्र गुरली, विजय शेळके, आबा गिरमे, राधाकिसन वलटे, महावीर शिंगी, नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, राजेंद्र कोळपकर, लक्ष्मण सताळे, तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके, मुख्य पंच सागर गांधी, प्रशांत धनगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडूंचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौसष्ट घरांच्या पटावर पडणारी प्रत्येक चाल ही एका नव्या शक्यतेची सुरुवात असते. आज कोपरगावमध्ये बुद्धिबळ खेळणाऱ्या या चिमुकल्या खेळाडूंपैकीच एखादा उद्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकून ग्रँडमास्टर बनेल, अशी आशा या स्पर्धेने निर्माण केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!