
संपादक – राजेंद्र तासकर
गेल्या आठवडाभरापासून नाशिक कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणांत पाउस झाल्याने दारणा गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे,गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन शुक्रवारी सुमारे ३७ हजार क्सुसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यांत येत आहे मात्र अद्यापही गोदावरी कालवे कोरडेच आहेत तेंव्हा या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्यांना तात्काळ ओव्हरफलोचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,कोपरगांव तालुका कार्यक्षेत्रात यंदाचा पावसाळा उशीरा सुरू झाला तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पाउस पडला.११ जुलै रोजी ७९ हजार,१२ जुलै रोजी ७२ हजार ७१७,१३ जुलै रोजी ६५ हजार २७२,१४ जुलै रोजी ५८ हजार तर १५ जुलै रोजी ३७ हजार ४४५ क्युसेक्स पाणी गोदावरी नदीला सोडण्यांत आलेले आहे.बारमाही गोदावरी कालवे लाभक्षेत्र विस्तीर्ण आहे, येथील शेतीला दुग्धोत्पादनाचा जोड धंदा आहे त्यामुळे मोठया प्रमाणांत पशुधन शेतक-यांकडे आहे,काही भागात पेरण्या उशीराने सुरू झाल्या आहेत, पशुधन जगविण्यासाठी हिरव्या चा-याची आवश्यकता आहे त्यासाठी गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडले तर त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे याभागातील पाण्यांची पातळी देखील वाढेल तेंव्हा ओव्हरफलोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडुन त्याद्वारे या भागातील शेततळी,दगडी साठवण बंधारे,पाझर तलाव भरून द्यावेत जेणेकरून त्याचा जनावरांना पिण्यांच्या पाण्यासाठी उपयोग होईल तरी उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता,नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी या मागणीचा प्राधान्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा व गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे असेही सौ.कोल्हे शेवटी म्हणाल्या.