
कोपरगावात भाजपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मंगळवारी (६ डिसेंबर) कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ.आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आंबेडकर मैदानावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे भारताने जगाला आदर्शवत ठरेल अशी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. त्यांनी दिलेल्या सर्वसमावेशक संविधानामुळेच दीन-दलित,कष्टकरी, शोषित,वंचित समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला. सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. बाबासाहेबांमुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकला,असे विचार बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी सकाळी कोपरगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर एस.टी. बसस्थानकाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव,भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपक गायकवाड,तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर,शहराध्यक्ष देवराम पगारे,माजी नगरसेवक बबलू वाणी, रवींद्र रोहमारे,दिनेश कांबळे,अशोक लकारे,गोपीनाथ गायकवाड,किरण सुपेकर,भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी,दीपक जपे,भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिऱ्हाडे,सोमनाथ म्हस्के,चंद्रकांत वाघमारे,संतोष नेरे,संतोष साबळे, संजय खरोटे,अनिताताई साळवे, सोमनाथ आहिरे आदींसह भाजप,युवा मोर्चा व आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बिपीनदादा कोल्हे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.ते म्हणाले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे तत्त्व आणि मानवतावादी विचारवंत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे भारताने जगाला आदर्शवत ठरेल अशी लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. आज आपल्याला चांगली फळे चाखायला मिळत आहेत त्याचे एकमेव कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आदर्श राज्यघटना होय.आज आपण केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत.डॉ. आंबेडकर यांनी देशाला,समाजाला दिशा आणि प्रगतीचा विचार दिला. त्यांच्यामुळे देशात सामाजिक क्रांती झाली.समानता,एकात्मता,अखंडता आणि बंधुभावाचा विचार रुजला.डॉ. आंबेडकर यांनी समाजातील उच्च-नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.बाबासाहेबांनी दुर्बलांना सशक्त करण्याचे काम केले. सामान्य माणूस हा बाबासाहेबांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता.त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील वंचितांच्या हक्कांना,मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले.दलित,वंचित व मागासवर्गीय समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकून त्यांना ‘शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा,’असा मूलमंत्र त्यांनी दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लोकशाही समाजवादाचा,धर्मनिरपेक्ष मार्ग हाच उद्याच्या भारताला जोडणारा महामार्ग आहे.यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा विचार पुढे नेण्याची गरज आहे.
उच्चशिक्षणाद्वारे समता,स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण व्हावा,हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ध्यास होता.त्यांना दीन-दलित,शोषित,कष्टकरी समाजाच्या तसेच शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण होती.जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतिमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतिमान करणारे साधन आहे.त्याचा वापर केला गेला पाहिजे,सामाजिक समतेबरोबरच संधीची समानता निर्माण केली पाहिजे,असा आग्रह धरून देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करणाऱ्या आधुनिक नेत्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर अग्रणी होते.सामाजिक समता,सामाजिक न्याय,बंधुता या मूल्यांची जोपासना व्हावी,यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला.त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असेही बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.