

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सध्याच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे.अशा परिस्थितीत सत्यगाव येथील गावकऱ्यांनी आणि पुस्तक प्रकाशन समितीने नवोदित लेखिका पूजा बाळकृष्ण सांगळे यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य,आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढाकार घेतला ही आनंदाची बाब आहे.लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्याबरोबरच तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
येवला तालुक्यातील सत्यगाव येथील कवयित्री पूजा बाळकृष्ण सांगळे यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य, आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवर्य प.पू.राजूबाबा सोनवणे (आजंदे) यांच्या हस्ते शनिवारी झाले.सत्यगाव येथील गावकऱ्यांनी आणि पुस्तक प्रकाशन समितीने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्यास विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून लेखिका पूजा सांगळे यांना शुभेच्छा दिल्या.पूजा सांगळे यांचे हे पहिलेच पुस्तक असून,त्यांनी या पुस्तकातून आयुष्य,आव्हान आणि संघर्ष या विषयांची अत्यंत सुंदर मांडणी केली आहे.पूजा सांगळे यांनी अगदी लहान वयात पुस्तकलिहिण्याचे धाडस करून हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे,अशा शब्दांत विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, लेखणी (कलम) हे तलवारीपेक्षा धारदार शस्त्र आहे,असे म्हटले जाते. पूजा सांगळे यांनी लेखणीचा प्रभावशाली वापर करून ‘आयुष्य, आव्हान आणि संघर्ष’ हे सुंदर पुस्तक लिहिले आहे.त्यांच्या या पुस्तकातून इतर लोकही निश्चितच प्रेरणा घेतील. आयुष्य,आव्हान आणि संघर्ष हे विषय सगळ्यांच्या आवडीचे आहेत.आयुष्य या शब्दाची फार मोठी व्याख्या करता येईल.आयुष्यात अनेक खाचखळगे असतात,त्यावर मात करून आपण जगत असतो.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागते.जन्म घेतलेल्या बाळाला पहिला श्वास घेताना जसे आव्हान असते,तसे शेवटच्या घटका मोजताना सुद्धा एक आव्हान असते.या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला जीवनात संघर्ष करत-करत वेगवेगळे टप्पे गाठावे लागतात.असा हा नाजूक विषय घेऊन एका तरुणीने हे पुस्तक लिहिले आहे याचा जास्त आनंद वाटतो.कारण, स्त्रीइतका संघर्ष इतर कोणाच्याही वाट्याला येत नसतो.लहानपणी आपल्याला आपली आजी,आजोबा, आई काही ना काही वाचून दाखवायचे,काही गोष्टी सांगायचे;परंतु आता मात्र काळ बदलत चालला आहे. हल्ली मोबाईल हातात दिल्याशिवाय लहान मूलदेखील जेवण करत नाही. इतकी परिस्थिती बदलली आहे.पूर्वी आपल्या गावाची प्रगती तिथेअसलेल्या वाचनालय-ग्रंथालयावरून ठरवली जात असे.मात्र,आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे.माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो.आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत वाचनापासून दूर जात असल्याचे चित्र आहे.तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी,त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे,असेही ते म्हणाले.
माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा अटळ आहे.पृथ्वीतलावर सर्व प्राणी जगतात आणि मरतात;परंतु मनुष्य हा असा एकमेव आहे की,ज्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता असते.त्या विचाराच्या जोरावर आपण आपले ध्येय निश्चित गाठू शकतो.कुठलेही यशस्वी पुरुष घ्या,स्त्रिया घ्या २४ तासांच्या पलीकडे आपल्याकडे वेळ नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असतील किंवा अदानी,अंबानी यांच्यासारखे मोठमोठे उद्योगपती असतील किंवा आपण सर्वसामान्य शेतकरी,आपल्या प्रत्येकाकडे २४ तासांचा वेळ आहे.या २४ तासांचा आपण वापर कसा करतो हे खूप महत्त्वाचे आहे.याच्यावरच आपला वर्तमानकाळ व भविष्यकाळ अवलंबून आहे,असे कोल्हे यांनी सांगितले.
याप्रसंगी विधान परिषद सदस्य किशोर दराडे,माजी आमदार मारोतराव पवार,नाशिक येथील व्ही. एन.नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे येवला तालुका संचालक नंदकिशोर बनकर,नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष ॲड.माणिकराव शिंदे,येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड,युवा सेना विस्तारक प्रियांका जोशी (बुलडाणा),कांदा उपादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे,सरपंच परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक योगेश पाटील (एम.आय. टी.पुणे),अभिनेता,लेखक जयेश पवार,प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके,लेखक किरण आवारे,मनसेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे,ज्येष्ठ हिंदी अनुवादक प्रा.डॉ.जिभाऊ मोरे आदी मान्यवरांसह सांगळे परिवार,सत्यगावचे ग्रामस्थ, पुस्तक प्रकाशन समितीचे पदाधिकारी, ग्रंथप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.