
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
माजीमंत्री स्व.शंकरराव गेनूजी कोल्हे म्हणजे ज्ञानाचा अफाट सागर.एखादा गोष्टीची माहिती नसेल तर तो विषय मुळापासून समजून घेणे हा शंकरराव कोल्हे यांचा व्यासंग होता.राज्य सहकारी बँकेत काम करतांना साखर धंदा,सहकार राज्यातील अन्य साखर कारखान्यांची परिस्थिती,प्रतिकुल परिस्थितीत शेतकरी वर्गाला मदत कशी करायची,आपत्ती आली तर काय उपाययोजना करायच्या आदि समस्यांच्या पिचवर शंकरराव कोल्हे गोलंदाज थकून जाईल पण बॅटींग करत रहायचे.
संजीवनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपला होता.शेतक-याला गाळप उसाचे पार्ट पेमेंट करावयाचे होते मात्र त्यांच्या बँक मालतारण खाती पुरेशी आर्थीक उपलब्धता नव्हती त्यासाठी त्यांनी आपल्याला फोन करून राज्य सहकारी बँकेच्या नाशिक कार्यालयाचा अहवाल घेवुन उचल प्रस्ताव तयार करून घेवुन येतो असे फोनवर सांगितले.
या प्रस्तावातील तपासणी करून दिली,त्यावर त्रुटींची पुर्तता संजीवनीच्या अधिका-यांनी करून दिली.स्व. शंकरराव कोल्हे,तत्कालीन कार्यकारी संचालक व्ही.पी.उर्फ वेलूवायळ पंढरीनाथ नायडु यांना घेवुन कुलाबा मुंबईत बँकेच्या अतिथीगृहात सकाळीच दाखल झाले होते.
राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक व तत्कालीन अध्यक्ष विष्णू आण्णा पाटील यांच्याशी चर्चा केली.शेतक-यांना पेमेंट करावयाचे आहे त्यासाठी पैसे पाहिजे असे शंकरराव कोल्हे यांनी सांगितले.संचालक मंडळाच्या बैठकीत लागलीच टिपण ठेवण्यांत येवून त्याच बैठकीत संजीवनीचा छाननी प्रस्ताव मंजुर केला.केव्हढी ही तत्परता आणि शेतक-यांबद्दलची काळजी त्यामुळे आपण थक्क झालो.हे सगळं काम त्यांचा सहकारी करू शकत होता पण स्वत: हजर राहुन काम करणे ही त्यांची खासीयत होती.
आता आपण सध्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतांना शंकरराव कोल्हे यांच्या प्रत्येक कार्यांची आठवण होते.तिस-या पिढीतील संचालक विवके कोल्हे हे देखील त्याच तडफेने जिल्हयातील. शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेतात.
रावसाहेब लक्ष्मण वर्पे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक.