Homeकोपरगावरेल्वेच्या भुयारी मार्गातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा; स्नेहलताताई कोल्हे यांची रेल्वे...

रेल्वेच्या भुयारी मार्गातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा; स्नेहलताताई कोल्हे यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आले असून,या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे नागरिकांना भुयारी मार्गातून ये-जा करणे कठीण झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात व इतर अनेक ठिकाणी शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे रेल्वे विभागाने भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी,अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेद्नाद्वारे केली आहे.

माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेद्नात म्हटले आहे की,भारतीय रेल्वेने देशातील सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंदकरण्याचा निर्णय घेतला व त्याऐवजी बहुतांश ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग सुरू केले आहेत.मात्र,चुकीच्या डिझाईन व बांधकामामुळे अनेक ठिकाणी या भुयारी मार्गावर पावसाळ्यात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करणे अवघड बनले आहे. मनमाड-दौंड हा लोहमार्ग कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून गेलेला आहे.दररोज अनेक रेल्वेगाड्यांची रेलचेल असलेल्या या रेल्वेमार्गावर कोपरगाव तालुक्यात भोजडे चौकी, संवत्सर,आंचलगाव,बोलकी आदी ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आलेले आहेत.ज्या ठिकाणी रेल्वेमार्गावर भुयारी मार्गाचे (अंडर पास) बांधकाम केले आहे,त्या ठिकाणी दरवषी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते.या साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने हे भुयारी मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.या भुयारी मार्गात पाणी साचल्याने शेतकरी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, दुचाकी,चारचाकी वाहनचालक, कामगार व नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.बहुतांश ठिकाणचे भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत.त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निचरा होत नाही.हे पाणी भुयारी मार्गाच्या मधोमध साचत आहे.परिणामी,नागरिकांना व वाहनचालकांना या भुयारी मार्गातून जाणे अवघड झाले आहे.बहुतांश भुयारी मार्ग पाणी साचल्याने बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर बऱ्याच ठिकाणी भुयारी मार्गांमध्ये सध्या पाणी साचले आहे.सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून,या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी शहरातून बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदींची वाहतूक करणे अशक्य बनले आहे.या भुयारी मार्गाचा दररोज वापर करणारे विद्यार्थी, कामगार,लहान-मोठे व्यावसायिक व इतरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढणे कठीण झाले आहे.रेल्वेच्या भुयारी मार्गात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कसलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. काही अंडरपासमध्ये तर बारमाही पाणी साचते. दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेच्या भुयारी मार्गांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूकच बंद होते.त्यामुळे गावठाणातील शेतकऱ्यांना रेल्वेमार्गाच्या पलीकडे अगदी नजरेसमोर दिसणाऱ्या आपल्या शेतात जाण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागतो.मागील अनेक महिन्यांपासून लोकांचे असे हाल सुरू आहेत.रेल्वे विभागाने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात सतत पाणी साचत असल्यामुळे दळवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाच ते सात फुटांपर्यंत पाणी साचलेले असते.त्यामुळे भुयारी मार्ग कसा ओलांडायचा असा प्रश्न उदभवतो.अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने मध्येच बंद पडतात व वाहनांचे मोठे नुकसान होते. भुयारी मार्गात पाणी साचल्याने भुयारी मार्गावर असलेले रेल्वे रूळ जीवमुठीत धरून ओलांडण्याशिवाय पादचाऱ्यांपुढे पर्याय नसतो.त्यामुळे रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.त्यातून अनेकदा अपघातही घडतात.रेल्वे विभागाने मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवावा,अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तातडीने या प्रश्नात व्यक्तिश: लक्ष घालून याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत,अशी विनंतीही स्नेहलताताई कोल्हे यांनी निवेदनात केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!