
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या विभागाकडुन दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने,अपंग जनता दल, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.अनिसभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.२७ मार्च २०२३ रोजी दिव्यांगांनी मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी दिव्यांगांच्या मानधनात ५००रूपये वाढ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने पुन्हा दिव्यांगांनी दि१० जुलै २०२३ रोजी मंत्रालयाला घेराव अंदोलनाची हाक दिली आहे.
संबधित विभागाकडून दिव्यांगांच्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दिले जाणारे १००० रूपये मानधन हे तुटपुंज आहे.बहुतांश दिव्यांगांचा उदरनिर्वाह मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून आहे,मिळणारे मानधन हे तुटपुंज असूनही वेळेवर न मिळाल्याने उपासमारीची वेळ येते.दिव्यांगांना कमीत कमीत ३००० रूपये मानधन मिळावे यासाठी २७ मार्च रोजी दिव्यांगांनी मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन केले, त्यावेळी संबंधित विभागाकडून आश्वासन देण्यात आले कि,दिव्यांगांच्या मानधनात ५०० रुपये वाढ करण्यात येणार असल्याचे आम्ही परिपत्रक जारी करणार आहे.परंतु तब्बल तीन महिने उलटून गेले तरी नाही परिपत्रक जारी झाले आणि नाही मानधनात वाढ झाली. यामध्ये फक्त दिव्यांगांची फसवणूक होऊन हेळसांड व ससेहोलपट होत असल्याने,अपंग जनता दल या सामाजिक दिव्यांग संघटनेला नाइलाजास्तव मंत्रालयाला घेराव आंदोलनाचे हत्त्यार उपसण्याची वेळ आली आहे.
या आंदोलनात एकच मागणी असेल आणि ती म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे ५०० रूपये वाढीव मानधन एप्रिल २०२३पासून लागू करून जी आर निर्गमीत करण्यात यावे.या एकच मागणीसाठी मुंबई मंत्रालयाला दिव्यांगांचे घेराव आंदोलन होणार आहे.यामध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीस मंत्रालय संबंधित विभाग जबाबदार राहील.
या आंदोलनासाठी अपंग जनता दल या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.अनिसभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र अध्यक्ष मा.आनंदा पाटील व महिला महाराष्ट्र अध्यक्षा सौ. कुसुम सुकासे यांच्या अध्यक्षतेखाली,जाकिर शेख.राज्य कार्याध्यक्ष यांच्या प्रेरणेने,भाऊसाहेब दशपुते. राज्य संपर्क प्रमुख,शेख कलीम.राज्य सचिव,राजीक शाह. राज्य महासचिव,अकिल शेख.जेष्ठ राज्य उपाध्यक्ष, सौ.पुष्पा नाईक,रमेश मोहिते, मयुर पाटील,लक्ष्मण वाघे, बाळासाहेब लांडे,भिमराव यादव, शाकिर अंन्सारी या राज्य अध्यक्षांसह बहुसंख्येने दिव्यांग बांधव व महिला या आंदोलन सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाच्या आयोजकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बंधु – भगिनींना आवाहन करण्यात येते कि, “अभी नही तो कभी नही ” आपल्या हक्कासाठी या लढयात मोठया संख्येने सहभागी व्हावे हि कळकळीची विनंती राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांनी केली आहे.