Homeकोपरगाववन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा -स्नेहलताताई कोल्हे

वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा -स्नेहलताताई कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोपरगाव शहर व परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत असून,भर लोकवस्तीमध्ये राजरोसपणे फिरणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून या बिबट्याचा बंदोबस्त करून भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित गांभीर्याने लक्ष घालून योग्य उपाय योजना करावी,अशी मागणी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

सैरभैर झालेला बिबट्या शहरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्याची दखल घेऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी ताबडतोब भ्रमणध्वनीद्वारे वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला व तहसीलदारांनीही यात लक्ष घालून मुक्त संचार करून वावरत असणाऱ्या बिबट्याला त्वरित पिंजऱ्यात कैद करावे.कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलावीत, अशी सूचना केली आहे.

सोमवारी (१६ ऑक्टोबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातील सुभाषनगर,बैलबाजार परिसरात बिबट्या राजरोसपणे फिरताना अनेक नागरिकांनी पाहिले. सुभाषनगर भागात घुसलेल्या बिबट्याने मनोज जाधव या युवकावर हल्ला करून त्याला जखमी केले. दिवसभर गायब झालेल्या या बिबट्याचे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरात नागरिकांना दर्शन झाले.तेथून बिबट्या धारणगाव रोडने मार्गस्थ झाला.दोन तासाहून अधिक वेळ बिबट्या या लोकवस्तीत राजरोसपणे फिरत होता. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या धारणगाव रोडवरून जात असताना अनेक नागरिकांनी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

मंगळवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परिसरात बिबट्या बराच वेळ वावरत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे त्यामुळे भीतीचे वातावरण सदर परिसरात निर्माण झाले आहे.या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी व मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात शेत- शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता.बिबट्याने काही जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या.याआधी जुलै महिन्यात कोपरगाव शहरात बिबट्याचा वावर आढळून आला होता.शहरातील इंदिरा पथ,बैल बाजार रोड,खडकी,कर्मवीरनगर,ओमनगर, गवारेनगर,समतानगर आदी परिसरात बिबट्याची जोडी आढळली होती. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असून,रात्री-अपरात्री बिबट्या शेतात फिरत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.त्यातच बिबट्या भक्ष्याच्या शोधात आता पुन्हा एकदा थेट कोपरगाव शहरात घुसल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे.सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून,शहरात रात्री- अपरात्री बिबट्या मुक्त संचार करत असल्यामुळे लहान मुले,महिला देवीच्या दर्शनासाठी व रास-दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत..सकाळ-संध्याकाळ मॉर्निंग-नाईट वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्येही बिबट्याची धास्ती आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्रीचे जागरण करावे लागत आहे.

सुदैवाने बिबट्यामुळे आजवर कोणतीही जीवितहानी झालेली नाही; परंतु वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त केला गेला नाही तर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी वन विभागाला त्वरित बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश द्यावेत आणि नागरिकांना भयमुक्त करावे,अशी सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!