
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
.
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेद्वारा संचलित कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागीर महाराज (एसएसजीएम) विज्ञान,गौतम कला आणि संजीवनी वाणिज्य महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल’ (नॅक) कडून ३.६९ गुणांसह ए++ मानांकन प्राप्त झाले आहे.या यशाबद्दल एस.एस.जी. एम. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शनिवारी (३फेब्रुवारी) महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसमवेत

गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थ्यां सोबत गाण्यांवर ठेका धरत शानदार नृत्य केले.एस.एस.जी.एम. महाविद्यालयाने ‘नॅक’चे ए++मानांकन मिळवून उत्तुंग झेप घेतली असून, आजचा हा दिवस महाविद्यालयाच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचेउपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड.भगीरथ शिंदे,प्राचार्य डॉ. आर.आर.सानप,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे,सुनील गंगुले,उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर, प्रा.अरुण देशमुख,डॉ.अर्जुन भागवत, प्रा.रामभाऊ गमे,आय.क्यू. ए.सी.चे समन्वयक प्रा.डॉ.नीलेश मालपुरे,कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी,विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विवेकभैय्या कोल्हे म्हणाले,उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल’ (नॅक) मार्फत देशभरातील सर्व महाविद्यालयांचे मूल्यमापन केले जाते.त्यानुसार ‘नॅक’ समितीने गतवर्षी एस.एस.जी.एम. महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील अध्यापन,अध्ययन, संशोधन, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम,डिजिटल लायब्ररी,वसतिगृह,क्रीडा,ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना व इतर विभागांतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे विविध उपक्रम तसेच पायाभूत व शैक्षणिक सोयी-सुविधांची पाहणी करून मूल्यांकन केले होते.एस.एस. जी.एम.महाविद्यालयाने ‘नॅक’ चे तीन टप्पे पूर्ण केल्यानंतर यु.जी.सी.च्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘नॅक’ समितीने चौथ्या टप्प्यात पुन्हा एकदा १४ व १५ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली होती. ‘नॅक’ समितीने गतवर्षी नोव्हेंबरनंतर देशातील ज्या महाविद्यालयांना पुन्हा भेट देऊन मूल्यमापन केले होते,त्यामध्ये ए++ मानांकन मिळवणारे एस. एस.जी.एम.महाविद्यालय हे देशातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष अॅड.भगीरथ शिंदे यांच्यानेतृत्वाखाली एस.एस.जी.एम. महाविद्यालयाने शैक्षणिक सुविधा व गुणवत्तेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी बजावून इतर महाविद्यालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे.एस.एस.जी. एम.महाविद्यालयाची दिवसेंदिवस संख्यात्मक व गुणात्मक वाढ होत असून,महाविद्यालयाने ‘नॅक’चे ए++ मानांकन मिळवले ही रयत शिक्षण संस्थेसह कोपरगाव तालुक्यासाठी निश्चितच गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे.या यशाचे सर्व श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप, सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,स्थानिक व्यवस्थापन समिती व महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य, संस्थेतील सर्व सेवक,विद्यार्थी यांना असल्याचे सांगून कोल्हे यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी अॅड.भगीरथ शिंदे म्हणाले, एस.एस.जी.एम.महाविद्यालयाला ‘नॅक’ कडून ए++ मानांकन प्राप्त झाल्याने रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक आणि कोपरगावकरांना खूप आनंद झाला आहे.सर्वांच्या सहकार्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयाने बी++ वरून थेट ए++ मानांकन मिळविण्याची किमया साधली असल्याचे सांगून याकामी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.