
संपादक – राजेंद्र तासकर
सरालाबेट आणि संजीवनी हे एक अध्यात्मीक अतुट नाते आहे,या नात्याला सातत्यांने मदतीचा हात देणारे शंकरराव कोल्हे कृषि आणि ऋषी संस्कृतीच्या जडणघडणीतील व्यक्तीमत्व होते.शेतक-यांच्या प्रश्नांवर लढवैये कर्तृत्व म्हणून त्यांचा लौकीक होता अशा शब्दात सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी श्रध्दांजली वाहिली.
श्रीमती सिंधुताई कोल्हे, व कोल्हे कुटूंबियांची महंत रामगिरी महाराज यांनी भेट घेवुन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते.नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे कार्यकारी विश्वस्थ अमित कोल्हे, सुमितदादा कोल्हे,जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे,प्रणव वसंतराव पवार,वेदांग मिलींद कोल्हे,डॉ.प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार,आदि यावेळी उपस्थित होते.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,आपण ज्या ज्या ठिकाणी भागवतकथा केल्या त्या श्रवणासाठी शंकरराव कोल्हे नित्यनियमांने यायचे. नारायणगिरी महाराज यांच्याबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते.बेटाच्या गादीवर विराजमान होण्याच्या आधीपासून त्यांचे आणि आपले संबंध होते. तुकाराम गाथेचा त्यांनी अभ्यास करून दैनंदिन सामाजिक कार्यात त्याची गुंफण केली होती.शेती आणि शेतकरी हा त्यांचा आवडीचा विषय होता.संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत त्यांनी या भागात पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी गवसणी घालण्यागत काम उभे केलेले आहे.गोदावरी नदीवर बांधलेल्या साखळी बंधा-याच्या दुरुस्तीच्या कामात संजीवनीचे योगदान विसरता येणार नाही,नाउर बंधा-याच्या कामातही शंकरराव कोल्हे व संजीवनी व्यवस्थापनाचे लक्ष आहे.सरालाबेटावर आजवर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांनी मोलाचे सहकार्य केले असुन या परिसराच्या विकासाचा आराखडा महाराष्ट्र शासनाला सादर करून त्याला निधी मिळविण्यासाठी शंकरराव कोल्हेंसह सर्व आजी माजी मंत्री यांचेसह सर्वच राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या मंडळींचा मोठा पाठपुरावा राहिलेला आहे. राजकीय क्षेत्रात काम करतांना अध्यात्मीक विचारांची बैठक जोडीला असली की,हाती घेतलेल्या कामात यश मिळत असते त्यामुळे शंकरराव कोल्हे आणि अध्यात्मीक काम हे एक वेगळे सुत्र तयार झाले होते,मात्र त्याचा त्यांनी कधीही गवगवा केला नाही.शेतक-यांच्या जीवनांत आनंद निर्माण करण्यांत शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा होता,त्यांच्या जाण्याने एक उत्तुंग कृषितुल्य व्यक्तीमत्व हरपले असेही रामगिरी महाराज शेवटी म्हणाले.