
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – एकीकडे कोपरगाव शहरालगत गोदावरी नदी भरून वाहत आल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना जवळ आला,तरी कोपरगाव शहराला पिण्यासाठी १२ दिवसा आड पाणी मिळत असल्याने ” घागर उशाला अनं कोरड घशाला “अशी अवस्था कोपरगाव शहरवासीयांची झाली असल्याची खंत माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
एकेकाळी कॅलिफोर्निया समजला जाणारा कोपरगाव तालुका आज पाण्या अभावी दिवसेंदिवस भकास होत चालला आहे.धरण भागात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला नांदूरमधमेश्वर धरणातून कॅनलला पाणी सोडले आहे.त्यामुळे नगरपालिकेने ४ दिवसाआड म्हणजे ५ व्या दिवशी पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा.जेणेकरून महिला भगिनींना नागरिकांना झालेल्या व होणारा पाण्याचा त्रास थांबेल.
गेल्या तीन महिन्यापासून साधारण नागरिकांना गडूळ दुर्गंधीयुक्त पाणी नगरपालिका पिण्यासाठी पुरवठा करत होते.त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये,त्यासाठी नगरपालिकेने शहरात असणारे फिल्टरेशन प्लांट/पाणी शुद्धीकरण केंद्र यावर लक्ष ठेवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवावे.जेणेकरून पावसाळ्यात होणारे पाण्यामुळे साथीचे आजार हे होणार नाही,याची काळजी ही नगरपालिका प्रशासनाने घ्यावी अशी मागणी श्री.पाटील यांनी प्रशासनाकडे याद्वारे केली आहे.
नगरपालिकेला पाणीपुरवठा दिवस अचानकपणे वाढवण्याची वेळ येऊ नये यासाठी वेळोवेळी लक्ष ठेवून सातत्याने चार दिवसाआड पाणी पुरवठा कायमस्वरूपी कसा करता येईल अशा पध्दतीने नगरपालिका प्रशासनाने काळजीपूर्वक नियोजन करावे अशी विनंती शेवटी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.