
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हयातर्फे नुकतेच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या समितीने प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक श्री. दिनेश अशोक कांबळे सर यांचा “सावित्री ज्योती प्रेरणा आदर्श शिक्षक “ म्हणून निवड केल्याचे अधिकृत पत्र देऊन पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. सदर गौरव सोहळ्यात श्री.दिनेश अशोक कांबळे यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

श्री.दिनेश अशोक कांबळे सर पुणे जिल्ह्यातील वेल्हे (राजगड) या अतिशय दुर्गम तालुक्यातील जि.प. प्रा.शाळा आंबेगाव खुर्द केंद गोंडेखल येथे प्रथम नियुक्तीपासूनआजतागायत आपली शिक्षणरूपी सेवा देत आहेत. डोंगरखोऱ्यातील सामाजिकरित्या दुर्बल, वंचित पण गुणी अशा विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आपल्या सहजसोप्या आणि कृतीयुक्त अध्यापन पद्धतीने सर विद्यार्थीप्रिय आहेत.
श्री.दिनेश कांबळे सर विद्यार्थी हिताचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारे विविध शैक्षणिक, सामाजिक,साहित्यिक उपक्रम सातत्याने राबवत असतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीने सरांच्या या कार्याची दखल घेत वर्ष २०२५ साठी ०३ जानेवारी माता सावित्री या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका यांची जयंतीच्या निमित्ताने दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करत श्री.दिनेश कांबळे यांचा सावित्री ज्योती प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला आहे.
त्याचबरोबर ते स्वतः एक उत्तम कवी, गझलकार,शिक्षक म्हणून सुपरिचित आहेत.सरांच्या साहित्यीक कृतींनाही आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.सदर सन्मानामुळे श्री.दिनेश कांबळे सरांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘क्रांतीज्योती माता सावित्रीच्या नावाने सदर पुरस्कार मिळाल्याने जेवढी प्रेरणा मिळाली आहे.त्यापेक्षाअधिक प्रमाणात सामाजिक शैक्षणिक कार्याची जबाबदारीही वाढली असल्याचे मत श्री.कांबळे सरांनी पुरस्काराला उत्तर देतांनाआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.