
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगांव : – तालुक्यातील श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ, राजगुरू,अनंत विभूषित, महाराष्ट्र पिठाधिश्वर, महामंडलेश्वर, दत्तात्रेयरत्न महान तपस्वी सदगुरू स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपाप्रेरणेने पावन झालेल्या धर्मपीठ श्रीक्षेत्र मंजुर येथे महाकुंभ पर्वावर महाशिवरात्र उत्सवानिमीत्त अखंड पंचमहायाग सप्ताहाचे २० ते २७ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यांत आले आहे.

सप्ताहाचे हे सव्वीसावे वर्ष आहे. याचकाळात शिवनामजप, रूद्रचंडीयाग, सामुदायीक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे.श्रीक्षेत्र मंजुर येथील भूमी संत शाहिर परसराम महाराज व गणेशगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. या सर्व कार्यकमांस तालुक्यातील सर्व क्षेत्रातील भाविक तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार आदि क्षेत्रातील विविध मान्यवर आजी माजी लोकप्रतिनिधी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी पदाधिकारी प्रमुख पाहुणे माणून उपस्थित राहणार आहेत.
रूद्रचंडी यागाची सांगता २७ फेब्रुवारी रोजी महामंडलेश्वर शिवानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वाजता तर दत्त संस्थान देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनांने होणार आहे. त्रंबकेश्वर येचील संत निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था निलपर्वत येथील शिक्षक, विद्यार्थी वृंद व मंजुर पंचकोशीतील सर्व भाविक आदिचे विशेष सहकार्य मिळत आहे.तर महाशिवरात्रदिनी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ या काळात सिध्देश्वर रूद्राभिषेक व निशानपुजा, त्यानंतर मुकुट मिरवणुक तर दुपारी ४ वाजता स्वामी शिवानंदगिरी महाराज यांचे जाहिर प्रवचन होईल.,प्रयागराज महाकुंभमेळा पर्यावर यंदाचे महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी हभप स्वस्वरूपानंदगिरी महाराज (२० फेब्रुवारी), हभप केशव महाराज हगवणे (२१ फेब्रुवारी), हभप कैलासगिरी महाराज (२२ फेब्रुवारी), हभप रामानंदगिरीजी महाराज (२३ फेब्रुवारी), हभप महंत उदय महाराज मंडलिक (२४ फेब्रुवारी), हभप विकास महाराज झिरपे (२५ फेब्रुवारी), हभप दत्तनाथ महाराज (२६ फेब्रुवारी), यांचे रात्रौ ७ ते ९ या काळात किर्तनाचे आयोजन केले आहे.
आचार्य वेदमुर्ती स्वप्नील गजानन कुलकर्णी (कारवाडी), सुधाकर राजाराम कुलकर्णी (कोळपेवाडी), सुनिल बापूराव जोशी (सुरेगांव), वेदशास्त्र संपन्न निखील जोशी, शशांक विजय सातभाई,अक्षय कुलकर्णी (कोळपेवाडी), सुनिल गजानन कुलकर्णी (कारवाडी) हे महारूद व सहस्रचंडी महायागाचे आचार्य असणार आहेत. तर व्यासपिठ चालक म्हणून हभप सुधाकर महाराज आहेर हे मदत करणार आहेत. या संपूर्ण सप्ताहकाळात त्रिकाल आरती होईल, तरी भाविकांनी या सर्व धार्मीक कार्यक्रमाचा लाभ घेवुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट मंजूरचे वतीने करण्यात आले आहे.