
कोपरगाव : – डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा कथासंग्रह मॉरिशस देशात पोचला ही प्रेरणा फार मोठी आहे. त्यांचा ‘शब्द वाटू धन जनलोका’ हा समाज प्रबोधन उपक्रम प्रेरणादायी असून तोच साहित्यिकांचा खरा आनंद होय असे मत कोपरगाव येथील कवी, कथाकार हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जवळील इंदिरानगरमधील ग्रंथा वाचनालयात डॉ. उपाध्ये यांचा हेमचंद्र भवर यांनी सत्कार करून ‘धवल क्रांतीचा योद्धा’ स्व. नामदेवरावजी परजणे अण्णा: संघर्षगाथा, विचारमंथनआदी पुस्तके भेट दिली. त्याप्रसंगी साहित्यिक हेमचंद्र भवर बोलत होते.
यावेळी विश्वात्मक जंगली महाराज शैक्षणिक संस्थेतील अरुण अण्णासाहेब आहेर, राजेंद्र काशिनाथ भवर, सौ. तेजश्री राजेंद्र भवर यांचा डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विविध पुस्तके देऊन सन्मान केला. सौ. मंदाकिनी उपाध्ये, आरती उपाध्ये यांनी नियोजन केले.
हेमचंद्र भवर म्हणाले, नगरजिल्ह्यात चांगले साहित्यिक वातावरण आहे. श्रीरामपूरला वाचन संकृती प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंच, साहित्य परिवार हे नेहमीच साहित्यिकांना प्रेरणा देणारे उपक्रम करतात हा आदर्श जपला पाहिजे. ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची वाचन, लेखन भक्ती फार महत्त्वाची आहे, छोट्या छोट्या उपक्रमांतूनच ज्ञानदीप तेवता ठेवाला पाहिजे. डॉ. उपाध्ये यांचा कथासंग्रह मॉरिशसमध्ये संशोधन प्रकल्पात समाविष्ट झाला, हा आनंदोत्सव आहे, त्यांनी दिलेले संतश्री, शब्द प्रेरणा, वैभवशाली श्रीरामपूर, शब्द वाटू धन जनलोका ही पुस्तके वाचकांना वाचन, लेखन प्रेरणा देतील असे सांगितले.
राजेंद्र भवर, अरुण आहेर यांनी ग्रंथा वाचनालय पाहून आनंद व्यक्त केला. डॉ. उपाध्ये यांनी हेमचंद्र भवर यांची कोपरगावमधील साहित्य चळवळ, वाचन संस्कृती याविषयी कौतुक केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.