
कोपरगाव.:- साधु संत महंतांच्या दैनंदिन तपश्यर्चेसाठी दक्षिणगंगा गोदावरीचा घाट अत्यंत पवित्र असुन श्रीक्षेत्र कोकमठाण येथील तीनखणीत वास्तव्यास असलेले ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांनी संस्काराची शिकवण देत अध्यात्माचा प्रसार केला असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांनी केले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमीत्त दासबोध पारायणास सोमवारी ५ जानेवारी रोजी प्रारंभ करण्यांत आला त्याचे विधीवत ग्रंथ व कलशपुजन प. पू. रमेशगिरी महाराज, ह भ प रामदास महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रामदासी महाराज भक्त मंडळाचे शरद थोरात, रंगनाथ लोंढे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यासपिठ चालक तुकाराम महाराज वेलजाळे यांनी दासबोध पारायणाची संथा दिली.
प.पू. रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, कोपरगांव शहर व तालुक्याच्या दक्षिणगंगा गोदावरी नदीकाठी असलेला परिसर अत्यंत पवित्र असुन असंख्य संत महतांच्या पदस्पर्शाने ही भुमि पावन झालेली आहे. ब्रम्हलिन संत रामदासी महाराज श्रीक्षेत्र कोकमठाण पंचक्रोशीत लहान मुला मुलींना अध्यात्माची शिकवण देत गीतेचे संस्कार दिले. कोकमठाण पंचक्रोशीतील भाविक अत्यंत नशिबवान असुन ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा सहवास आपणा सर्वांना लाभला. आज अभासी दुनियेचे जग मोठया प्रमाणांत वाढत आहे. त्यातुन लहान मुला- मुलींवर त्याचे विपरीत परिणाम जाणवु लागले आहे. त्यांना ज्या वयात संस्काराची शिकवण महत्वाची आहे त्या वयात त्यांच्या हाती भ्रमणध्वनी आले आहेत त्यामुळे चिंता वाटते. आई वडीलांनी आपल्या मुला-मुलींना अध्यात्म संस्काराची शिकवण जरूर द्यावी. कोकमठाण पंचक्रोशीतील भाविक गेल्या ३६ वर्षापासुन ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव एक वैचारीक महोत्सव म्हणून साजरा करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. कांचनवाडीचे संग्राहक हभप रामभाउ महाजन यांच्या वारकरी सांप्रदाय संपुर्ण काकडा पुस्तीकेचे रमेशगिरी महाराजांच्या हस्ते पुजन करण्यांत आले. याप्रसंगी कोकमठाण पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समर्थ भक्त दामोदरबुवा प्रकाश रामदासी, सर्वेशबुवा शुक्ल महाराज, समर्थ भक्त प्रसादबुवा रामदासी, उल्हास महाराज गोसावी यांच्या किर्तन महोत्सवाचे सप्ताह काळात आयोजन केले आहे. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या काल्याचे किर्तनाने १२ जानेवारी रोजी या कार्यक्रमाची सांगता होत आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे पौरोहित्य सोमनाथ गुरु जोशी यांनी केले.
कार्यक्रम कार्यस्थळी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सजावट अत्यंत देखण्या स्वरूपात करण्यात आली आहे.